पहिल्याच अग्निपरीक्षेत बीएमसीचा 'रोबो' नापास

अवाढव्य रक्कम खर्च करुन मुंबई महापालिकेनं आणलेला रोबो पहिल्या परीक्षेत नापास

Updated: Jul 24, 2019, 08:03 PM IST
पहिल्याच अग्निपरीक्षेत बीएमसीचा 'रोबो' नापास title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : आग विझवण्यासाठी खास अवाढव्य रक्कम खर्च करुन मुंबई महापालिकेनं आणलेला पाहुणा अर्थात रोबो पहिल्या परीक्षेत नापास झाला आहे. वांद्रे एमटीएनएलच्या आगीत याचा प्रयोग झाला. पण त्यामध्ये तो नापास झालाय. पालिका प्रशासनानंच स्थायी समितीत तशी कबुली दिली. एमटीएनएल इमारतीच्या आगीवेळी या रोबोला पुढे जाण्य़ासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना धक्का मारावा लागत होता.

मुळात हा रोबो चिंचोळ्या गल्ल्या, अडचणीचे रस्ते, रासायनांचे साठे असलेल्या ठिकाणची आग विझवण्यासाठी घेतला गेला. हा रोबो वांद्र्याच्या आगीत साधा पाईपही ओलांडू शकला नाही. याप्रकरणी भाजपानं प्रशासनला धारेवर धरत अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांच्या चौकशीची मागणी केली. तसंच रहांगदळे यांची उपायुक्तपदी होणारी बढती रोखण्याची मागणीही करण्यात आली. 

हा रोबो कुचकामी ठरणार असेल तर असे आणखी दोन रोबो खरेदी करण्याचा घाट कशासाठी, असा सवाल विचारला जातो आहे.