सलमान खानला हायकोर्टाचा धक्का; 'या' प्रकरणी अंतरिम दिलासा देण्यास नकार

सत्र न्यायालयात दिलासा न मिळाल्याने सलमान खानने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते

Updated: Oct 11, 2022, 01:43 PM IST
सलमान खानला हायकोर्टाचा धक्का; 'या' प्रकरणी अंतरिम दिलासा देण्यास नकार title=
(फोटो सौजन्य - PTI)

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई :  बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. सलमान खानविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दोन्ही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. मात्र न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे. त्यामुळे न्यायालयाने सलमान खानला (Salman Khan) अंतिम दिलास देण्यास नकार दिला आहे. (Bombay High Court refuses to grant interim relief to actor Salman Khan)

पनवेल (panvel) येथील फार्म हाऊस (farmhouse) शेजारी राहणाऱ्या केतन कक्कड (ketan kakkad) यांच्याविरुद्ध सलमानने मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध सलमान खानने (Salman Khan) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याआधी सत्र न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सलमान खानला कुठलाही दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

केतन कक्कड यांनी सिसहल मीडियाद्वारे सलमानवर अनेक आरोप केले आहेत, सोशल मीडियावरून तो मजकूर हटवावा अशी मागणी सलमानने केली आहे, मात्र न्यायालयाने याबाबत अद्याप निर्णय दिलेला नाही.

नेमकं प्रकरण काय?

केतन कक्कड यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला. यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी सलमानने केली होती. सलमान खानच्या फार्महाऊसशेजारी प्लॉट घेणाऱ्या केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलवर अनेक आरोप केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. यानंतर सलमानच्या वतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सलमानचा डी गँगच्या लोकांसोबत संबंध असल्याचा केतन यांचा आरोप होता. त्यांनी सलमानच्या धर्मावरही भाष्य केले होते. तसेच सलमान केंद्रातील पक्ष आणि राज्य पातळीवरील राजकारण्यांच्या जवळ असल्याचेही त्यांनी सांगितले.  सलमान चाइल्ड ट्रॅफिकिंगमध्ये गुंतलेला असून त्याच्या फार्म हाऊसवर चित्रपट कलाकारांचे मृतदेह पुरले जातात, असेही केतन यांनी म्हटले आहे.