आठवलेंच्या पक्षाकडून छोटा राजनच्या भावाला फलटणमधून उमेदवारी?

मित्रपक्षांच्या जागावाटपात घोळ, आठवलेंकडून मुंबईत एक जागा देण्याची मागणी

Updated: Oct 2, 2019, 06:02 PM IST
आठवलेंच्या पक्षाकडून छोटा राजनच्या भावाला फलटणमधून उमेदवारी? title=

मुंबई: कुख्यात गुंड छोटा राजन याचा भाऊ दीपक निकाळजे यांना रामदास आठवले यांच्या 'रिपाई'कडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दीपक निकाळजे हे फलटण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे सांगितले जात आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार ही जागा सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाच्या वाट्याला गेली आहे. तरीही रामदास आठवले या जागेसाठी आग्रही असल्याचे समजते. 

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजपने कमी जागांवर मित्रपक्षांची बोळवण केली आहे. यापैकी सहा जागा रिपाईच्या वाट्याला आल्याचे सांगितले जाते. तसेच रिपाईचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 'रिपाई'कडून तीन जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 

पक्षाच्या चौकटीबाहेरच्या वक्तव्यांमुळे खडसे अडचणीत- संजय काकडे

त्यानुसार मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून गौतम सोनावणे, फलटणमधून दीपक निकाळजे, पाथरीतून मोहन फड आणि नायगावमधून राजेश पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शिवाजीनगरच्या जागेवरही शिवसेनेकडून विठ्ठल लोकरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हा घोळ कधी निस्तरणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. 

मला आदित्यला लादायचे नव्हते, शिवसैनिकांनी त्याला स्वीकारलेय- उद्धव ठाकरे

सुरुवातीला शिवसेना-भाजपकडून मित्रपक्षांना १८ जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, शिवसेना-भाजपमधील रस्सीखेचीमुळे मित्रपक्षांची १४ जागांवर बोळवण करण्यात आल्याची चर्चा आहे.