Corornavirus : धारावीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, २५ रूग्ण वाढले

धारावीत कोरोनाचे रूग्ण वाढले 

Updated: May 9, 2020, 06:22 PM IST
Corornavirus : धारावीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, २५ रूग्ण वाढले title=

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. धारावीतही रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  २५ नवे रूग्ण धारावीत वाढले असून धारावीत आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या ८३३ वर पोहोचली आहे. यामध्ये मृतांचा आकडा २७ आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे धारावीत २२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे. माहिममध्ये ५ रूग्ण वाढले असून तिथं एकूण कोरोना रूग्णसंख्या ११२ झाली आहे. ज्यात ५ मृत्यू तर २८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. 

दादरमध्ये १८ नवे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे दादरमधील एकूण रूग्ण संख्या पोहचली आहे १०५ वर. यात ५ जणांचा मृत्यू तर १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील कोरोना (Coronavirus) रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारी मुंबईतील आरोग्य यंत्रणा एका नव्या घटनेमुळे धास्तावली आहे.

कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या धारावीतील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना साधारण महिनाभरापूर्वी COVID-19 टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. या सर्वांना १४ दिवस रुग्णालयात राहून व्यवस्थित उपचार घेतले होते. मात्र, आता या पाचही कोरोनामुक्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.