Coronavirus : दारूची दुकाने सुरू करण्यास कडाडून विरोध

दारमुळे कौटुंबिक हिंसाचार वाढतील 

Updated: Apr 25, 2020, 12:11 PM IST
Coronavirus : दारूची दुकाने सुरू करण्यास कडाडून विरोध  title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरूवातीच्या काळात सोशल डिस्टन्शिंग सांभाळता यावं याकरता मॉल्स, दारूची दुकाने, जिम यासारख्या गोष्टी बंद करण्यात आला. त्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊन होऊन आता एक महिना उलटला असून काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आहे. यामध्ये दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी केली जात आहे. याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कडाडून विरोध केला आहे. 

दारु दुकाने बंद ठेवल्यामुळे कोरोणाच्या प्रसाराला मोठ्या प्रमाणाला आळा बसलेला आहे. त्याचप्रमाणे दारुवर खर्च होणारा पैसा कुटुंबाच्या भरणपोषणासाठी खर्च झाल्यामुळे भुकेचा उद्रेकही काही प्रमाणांत कमी झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. यातुन अनेक व्यसनाधीन व्यक्ती कायमचे निर्व्यसनी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जे की अत्यंत समाधानाची बाब आहे.

असे असतांना राज्याचे आरोग्य मंत्री मा. राजेशजी टोपे यांनी मात्र दारुचे दुकाने सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही वाईन शॉप सुरु करावेत ही मागणी केली आहे  ती मागणी भविष्यासाठी अतिशय घातक ठरु शकते. कुठल्याही व्यसनामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होत असते. 

जागतिक आरोग्य संघटनेने देखिल व्यसनाला विरोध केलेला आहे आणि कुठलेही व्यसन हे अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसतांना दारुबंदी उठवणे दुष्परीणामकारक ठरेल असे आमचे स्पष्ट मत आहे. 
महसूलासाठी वाईन शॉप हे नीतिमत्ताचे पुराण नसून राज्यसरकारचे नितिमान कर्तव्य आहे. 

त्याचप्रमाणे आज हाताला काम नसताना गरीब कुटुंबातील महिला उरलेले पैसे जपून वापरत संसार चालवत आहेत. अशा स्थितीत दारू दुकाने सुरू झाली तर व्यसनी पुरुष ती बचत संपवून टाकतील प्रसंगी घरातील धान्य विकून दारू पितील व महिला अत्याचाराचे प्रमाण त्यातून वाढेल. 

राज ठाकरे यांनी गरीब कुटुंबावरील या परिणामाचा फारसा विचार केलेला नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडात असतांना महसुलासाठी वाईन शॉप सुरु केले पाहिजेत ही मागणी प्रथमदर्शनी योग्य वाटत असली तरी त्याचे दुष्परिणाम हे भयंकर होण्याची शक्यता आहेत. 

एका सर्वक्षणानुसार जर दारूपासून १० रुपये उत्पन्न मिळत असेल तर त्याचे जे समाजात होणारे जे दुष्यपरिणाम आहेत ते दहा पट असतात म्हणजेच १०० रुपये होत असतात. समाज व्यवस्था नीट सांभाळण्यासाठी संचार बंदीच्या काळात जे लोक शुद्धीत नियम पाळत नाहीत ते धुंदीत नियम पाळतील का? नक्कीच  नाही. यामुळे पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होऊ शकेल कारण मंदी पाठोपाठ लॉकडाऊन नक्कीच  बेरोजगारांना गुन्हा करण्यासाठी व्यसन बळ-डेरींग  देईल आपल्या माहितीच आहे.

व्यसन व गुन्हा हे दोघे ही एकत्रच कार्य  करतात आणि त्यामुळं  परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता जास्त आहे. आरोग्य विभागावर याचा ताण नक्कीच वाढणार आहे, कौटुंबिक स्वास्थ बिघडणार आहे, आम्हाला येणाऱ्या फोनवर  माता -भगिनीचे म्हणणे आहे की,घरात शांतात असून नवऱ्याची-पोरांची आणि आमची ही व्यसन सुटली आहेत आम्ही व्यसनमुक्त होत आहोत, व्यसन एक मानसिक आजार आहे आणि त्यातून मुक्त होण्याकरिता मनोबल वाढवणे आवश्यक आहे आणि हा काळ व्यसनमुक्त होण्यासाठी उत्तम परिस्थिती उपलब्ध करून देत आहे त्याचे सकारात्मक परिणाम ही आज समाज दिसून येत आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने उघडू नये यासाठी व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, श्रमिक एल्गारच्या परोमिचा गोस्वामी यांसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.