शालेय अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा विषयाचा समावेश होणार

शालेय अभ्यासक्रमामध्ये लवकरच नव्या विषयाची भर पडणार आहे.

Updated: Aug 19, 2019, 10:24 PM IST
शालेय अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा विषयाचा समावेश होणार title=

दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : शालेय अभ्यासक्रमामध्ये लवकरच नव्या विषयाची भर पडणार आहे. सायबर सुरक्षा हा विषयही विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. समाज माध्यम, अॅप्लीकेशन, गेम्स अशा विविध ठिकाणी नेटीझन्स आपले चेहरे, आवाज, वैयक्तीय माहिती,व्हिडिओ हे सगळं मोठ्या प्रमाणात सार्वजनिक झाल्याने, हा डेटा योग्य ठिकाणीच जातो का? त्याचा गैरवापर झाला तर ? असेही अनेक प्रश्न समोर येतात. पूर्वी फोटो मॉर्फ केले जायचे पण आता मोठ्या संख्याने व्हिडिओ अपलोड होत असल्याने व्हिडिओ मॉर्फींगचे प्रकारही वाढत चाललेत.

या सर्व विषयांवर नेहरु विज्ञान केंद्र, महाराष्ट्र सायबर सेल, इज्राईल कॉन्सूलेट या विभागांकडून चर्चा घडवून आणण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांनीही हजेरी लावली. 'सध्या राज्यात सर्वाधिक तक्रारी या समाज माध्यमावर बद्नामी, चुकीचे संदेश पसरवणा-या येतात. आजही सायबर पिडित तक्रारींसाठी पुढे येत नाहीत. तरुण मुलं, मुली यांनी काही चुकीचे घडत असेल तक्रार केलीच पाहीजे', असं सचिन पांडकर म्हणाले.

तर जबाबदार नेटीझन्स या संस्थेकडूनही सायबर सुरक्षेबाबत समुपदेशनाचे काम केले जाते. सायबर सुरक्षा हा विषय केवळ गुन्हेगारी स्वरुपातला नसून याचे लहान मुलांच्या मनावरही खोल परिणाम होत असल्याचे दिसून आलंय. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, ९० टक्के नेटीझन्सना सायबरसुरक्षेबद्दल माहिती नसते. ६ वर्षांनंतरची मुलं ४-६ तास इंटरनेट वापरतात. एका वर्षापेक्षाही कमी वयाची मुलं सर्रास मोबाईल वापरतात. गेम्सच्या माध्यमातून लहान मुलांचे लैंगिक शोषण होतं. दर १० पैकी ९ ऑनलाईन गेम्स हिंसक असतात.

सायबर गुन्हेगारी आणि सुरक्षा हे आताच्या पिढीसमोर सगळ्यात मोठे आव्हान असल्याने याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. तर शिक्षण विभागाकडूनही हा विषय अभ्यासक्रमात घेण्याबाबत प्रक्रीया सुरु झाली आहे.