राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे

Updated: Feb 13, 2023, 06:58 PM IST
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. इतकंच नाही तर महामंडळाच्या वाटपाबाबतही पवारांशी चर्चा केली होती आणि खातेवाटपाबाबतही पवारांशी बोलणं झालेलं होतं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 18 जानेवारी 2021 चा व्हिडिओ असून यात फडणवीस यांनी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं आहे. 

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
जेव्हा आम्ही निवडून आलो, निवडून आल्यानंतर शिवसेनेबरोबर (Shivsena) आमची बोलणी सुरु होती. पण शिवसेनेने आधीच काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) जाण्याचं निश्चित केलं होतं. त्यामुळे आम्हालाही पर्याय शोधणं क्रमप्राप्त होतं. दहा ते बारा दिवस यात निघून गेले होते. काँग्रेसबरोबर तर आम्ही जाऊ शकत नव्हतो. मग आम्ही एनसीपीबरोबर बोलणं केलं. आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला प्रस्ताव आला होता. 

आमचं बोलणं अंतिम टप्प्यात होतं, आता इथे कॅमेरा नाहीए त्यामुळे बोलण्यास काही हरकत नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पुढे काय घडलं ते सांगितलं. आम्ही सरकार बनवण्याची सर्व कवायत पूर्ण केली. म्हणजे खातेवाटप कसं असणार, पालकमंत्री कोणाला मिळणार या सर्व गोष्टी अंतिम झाल्या होत्या आणि हे  सर्व अजित पवारांशी नाही तर शरद पवारांशी बोलणं झालं होतं. प्रत्येक गोष्ट शरद पवार यांच्याशी बोलून अंतिम करण्यात आली होती. राजकारणात कधी कधी असं होतं, म्हणजे जे राष्ट्रपती शासन लागलं, त्यासाठी राष्ट्रवादीची जे पत्र होतं, ते पत्रही मीच लिहिलं होतं. 

शिवसेना आमच्याशी बोलण्यासही तयार नव्हते. माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाला. पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी केला. आमच्यासोबत निवडणुका लढवल्या, पण आपला मुख्यमंत्री होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी माझा फोनही घेतला नाही. त्यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर निघून गेले.  दुसरा विश्वासघात आपण सर्वांनी बघितला. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सर्व गोष्टी ठरल्या होत्या, पण ठरलेल्या गोष्टी बदलल्या. हा देखील एकप्रकारचा विश्वासघातच आहे.