हिरे व्यापारी उदानी हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे.  

Updated: Dec 12, 2018, 05:20 PM IST
हिरे व्यापारी उदानी हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक title=
संग्रहित छाया

मुंबई : हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे. महेश प्रभाकर भोईर, निखत ऊर्फ झारा मोहम्मद, सायीस्ता सरवर खान ऊर्फ डॉली या तिघांना पंतनगर पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात का, याची चर्चा सुरु झालेय. 

दरम्यान, या प्रकरणात झाराला, तुला एखादा चांगला रोल मिळवून देतो असे सचिन पवार आणि दिनेश पवार यांनी सांगून उदानीला तिची ओळख एक मॉडेल आहे, अशी करून दिली होती. ज्या वेळेला उदानीची हत्या करण्यात आली त्यावेळी ती तेथे उपस्थित होती, अशी माहिती पुढे आलेय. महेश भोईर आणि सायन्स ताक खान हे दोघे देखील या कटात सामील असल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या दोघांनी नेमकी कोणती भूमिका बजावली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

काय आहे ही घटना?

घाटकोपरमध्ये राहणारे उदानी २८ नोव्हेंबरला गायब झाले. त्यांची कार पूर्व द्रुतगती महामार्गावर सापडली, पण उदानी यांचा काहीच सुगावा लागला नव्हता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने माग काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उदानी दुसऱ्या कारने नवी मुंबईकडे गेल्याचं स्पष्ट झाले होते. दरम्यान, ३ डिसेंबरला पनवेलजवळ खाडीतील झुडपात एक मृतदेह सापडला. या मृतदेहावरील कपड्यांवरून तो मृतदेह उदानींचाच असल्याचं ७ डिसेंबरला स्पष्ट झाले.

कोण आहे सचिन पवार?

सचिन पवार हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय साहाय्यक आणि भाजपचा पदाधिकारी असल्यानं त्याच्या अटकेनंतर सगळेच जण चक्रावून गेले. दरम्यान, आता तो आपला स्वीय साहाय्यक नसल्याचं सांगतानाच, भाजपात गुन्हेगारांना स्थान नाही, असं प्रकाश मेहतांनी स्पष्ट केले. दरम्यान, सचिन पवार याने पाच वर्षांपूर्वी राजीनामा दिला आहे, त्यामुळे त्याचा भाजपाशी काही संबंध नसल्याचं, भाजप प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सांगितलं.