Farmers Protest : विधानसभा अध्यक्षांचा पंतप्रधानांना पत्रातून इशारा

 संविधानिक पदावर असूनही आंदोलन करू असा इशारा त्यांनी पत्राच्या माध्यमातून दिलाय. 

Updated: Dec 9, 2020, 05:29 PM IST
Farmers Protest : विधानसभा अध्यक्षांचा पंतप्रधानांना पत्रातून इशारा title=

मुंबई : देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलंय. शेतकरी आंदोलनाबाबत हे पत्र असून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची या पत्रात मागणी करण्यात आलीय. कायदे मागे न घेतल्यास संविधानिक पदावर असूनही आंदोलन करू असा इशारा त्यांनी पत्राच्या माध्यमातून दिलाय. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरलेय. केंद्राने आपल्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी त्यांनी 'भारत बंद' घडवून आणला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शेतकऱ्यांच्या कोअर टीमने भेट घेतली. पण यातही काही तोडगा निघाला नाहीय. देशभरात या आंदोलनाचे पडसाद दिसू लागलेयत. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी पत्र लिहून इशारा दिलाय. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेससहीत अनेक शेतकरी संघटनांनी पाठींबा दिलाय. सर्व संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. 

देशात शेतकऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन योग्य आहे. ही आत्मसन्मानाची लढाई नाही. ही देशाच्या अन्नदात्यांच्या अधिकाराची लढाई आहे.  म्हणून देशातील अन्नदाता कडाक्याच्या थंडीत, कोरोना संकटातही रस्त्यांवर उतरलेयत. तुम्ही जो कायदा बनवलाय तो शेतकरी विरोधी असल्याचे नाना पटोलेंनी आपल्या पत्रात म्हटलंय. म्हणूनच शेतकरी मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरलाय. शेतकऱ्यांची समस्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हा काळा कायदा मागे घ्याल अशी मला अपेक्षा असल्याचे पटोलेंनी म्हटलंय. 

पण तुम्ही जर हा कायदा मागे घेतला नाहीत तर सांविधानिक पद असूनही मला शेतकऱ्यांच्या लढाईत सामील व्हावे लागेल. तुम्ही जास्त वेळ न दवडता हा शेतकरी विरोधी कायदा परत घ्यावा असे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केलंय.