कुलाब्यातील 'बडेमिया रेस्टॉरंट' सील! किचनमध्ये उंदीर, झुरळं सापडल्याने सरकारकडून कारवाई

Bademiya Restaurant : दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित बडेमिया रेस्टॉरंट हे फूड लायसन्सशिवाय चालत असल्याच्या निदर्शनास आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 14, 2023, 08:03 AM IST
कुलाब्यातील 'बडेमिया रेस्टॉरंट' सील! किचनमध्ये उंदीर, झुरळं सापडल्याने सरकारकडून कारवाई title=

Mumbai News : दक्षिण मुंबईतील लोकप्रिय बडेमिया रेस्टॉरंटवर (Bademiya Restaurant) अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकला आहे. रेस्टॉरंटमध्ये आढळलेल्या अस्वच्छ खाद्यपदार्थांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यानंतर बडेमिया रेस्टॉरंट बुधवारी सील करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या तक्रारींवरून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बडेमिया रेस्टॉरंटवर छापा टाकला होता. छाप्यादरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांना  रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात झुरळ आणि उंदीर सापडल्याची माहिती समोर आली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी अधिक तपासणी केली असता देशाच्या स्वातंत्र्यापासून सुरु असलेल्या या रेस्टॉरंटकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत परवाना नसल्याचे समोर आलं आहे. असे असतानाही या रेस्टॉरंटच्या दक्षिण मुंबई आणि वांद्रे येथील दोन शाखा सुरू होत्या. हे रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरु असण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे अनेक खाद्यप्रेमी या रेस्टॉरंटला भेट द्यायचे. मात्र आता अस्वच्छतेबाबत माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

अस्वच्छ स्वयंपाकघर आणि परवाना नसल्यामुळे, एफडीएने तत्काळ बडेमिया बंद केले आणि त्याच्या मालकाला रेस्टॉरंटचे काम थांबवण्याची नोटीस देण्यात आली. "मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये छापेमारी आणि तपासणी सुरू आहे. ज्या हॉटेलवर छापे टाकण्यात आले त्यात बडेमिया हे एक आहे. दक्षता पथक आणि आमचे स्थानिक अधिकारी रेस्टॉरंटमध्ये गेले असता त्यांना आढळले की तिथे क्लाउड किचनमध्ये सेवा दिली जात होते. रेस्टॉरंटला कोणताही परवाना देण्यात आलेला नाही. तसेच तिथे स्वच्छतेच्या समस्या देखील समोर आल्या आहेत," अशी माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. "रेस्टॉरंटच्या एफएसएसएआय परवान्याचे अनेक वर्षांपासून नूतनीकरण करण्यात आले नव्हते. तसेच सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हे आवश्यक होते" असेही अधिकाऱ्याने सांगितले.

बडेमिया रेस्टॉरंटने दिले स्पष्टीकरण

"एक एफएसएसएआय परवाना वगळता आमच्याकडे सर्व परवाने हातात आहेत आणि त्यांचे नूतनीकरण झाले आहे. कोविड लॉकडाउन होईपर्यंत परवान्याचे नूतनीकरण केले गेले आहे आणि नंतरच्या कालावधीसाठी, आम्ही आमच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करण्यास तयार आहेत," असे बडेमियाच्या मालकाने सांगितले आहे.

दरम्यान, 1946 मध्ये तात्पुरते शीग कबाब काउंटर म्हणून सुरू केलेले, बडेमिया हे मुंबईतील एक प्रतिष्ठित रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट हे मुंबईच्या कुलाबा परिसरात आहे. हे रेस्टॉरंट पर्यटकांचे आकर्षण आहे. अनेक बड्या सेलिब्रिटींची देखील याला पहिली पसंती आहे.