पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती, दीड दिवसाच्या गणपती विसर्जनात 23 टक्के वाढ

Ganeshotsav 2023 : महानगरपालिकेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती वाढली आहे. पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावात यंदा दीड दिवसांच्या गणततीचं मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात आलं. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Sep 23, 2023, 07:22 PM IST
पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती, दीड दिवसाच्या गणपती विसर्जनात 23 टक्के वाढ title=

Ganeshotsav 2023 : मुंबईतला श्री गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Municipal Corporation) केलेल्या प्रयत्नांना मुंबईकरांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. यंदा महानगरपालिकेने तयार केलेल्या 194 कृत्रिम तलावांचा (Artificial Ponds) एकत्रित विचार करता, दीड दिवसांच्या एकूण 27 हजार 564 घरगुती गणेश मूतींचे कृत्रिम तलावांमध्‍ये विसर्जन (Ganpati Immersion) करण्‍यात आलं आहे. मागील वर्षी (2022) दीड दिवसांच्‍या 22 हजार 410 घरगुती गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जन करण्‍यात आलं होतं. म्हणजेच  गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा ही संख्‍या 5 हजार 154 ने अर्थात 22.98 टक्क्यांनी वाढली आहे. 

श्री गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने भाविकांना, नागरिकांना विविध सेवा- सुविधा पुरवल्या आहेत. समस्त मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक, दर्जेदार सेवा-सुविधांनी पूर्ण असावा, यासाठी प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत.  त्यापैकीच एक म्हणजे श्री गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी केलेली सुविधा. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून मूर्ती विसर्जनाच्‍या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आहे. 

श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्‍यासाठी मुंबईत 73 नैसर्गिक स्थळी विविध स्तरिय व्यवस्था केली आहे. तसेच, 194 ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळांची निर्मिती केली आहे. या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती मिळत आहे. कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यासंदर्भात महानगरपालिकेकडून सातत्‍याने होणाऱ्या जनजागृतीमुळे सन 2018 पासून कृत्रिम विसर्जन तलावांमध्‍ये गणेश मूर्तींचे विसर्जन संख्या वाढते आहे. 

गतवर्षी (2022) दीड दिवसांच्‍या 22 हजार 410 घरगुती मूर्तींचे कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जन करण्‍यात आलं होतं. तर या वर्षी दीड दिवसांच्‍या 27 हजार 564 मूतींचे कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जन करण्‍यात आलं आहे. गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा ही संख्‍या 5 हजार 154 ने वाढली आहे. पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टिने ही वाढलेली संख्या अतिशय सकारात्‍मक बाब ठरली आहे.

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी चोवीस प्रशासकीय विभागांमध्‍ये कृत्रिम तलावांची निर्मिती करण्‍यात येते. या कृत्रिम तलावांमध्‍ये गणेश मूर्तींचे प्राधान्‍याने विसर्जन करावे, अशी विनंती भाविकांना केली जाते. सन 2018 पासून त्‍याला सकारात्‍मक प्रतिसाद मिळत आहे. सन 2018 मध्‍ये दीड दिवसांच्‍या 16 हजार 825 घरगुती मूर्ती, सन 2019 मध्‍ये 14 हजार 442 मूर्ती, सन 2020 मध्‍ये 22 हजार 178 मूर्ती, सन 2021 मध्‍ये 24 हजार 273 मूर्ती तर सन 2022 मध्‍ये 22 हजार 410 घरगुती मूर्तींचे विसर्जन करण्‍यात आलं.

यंदा दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी म्रणजे 20 सप्‍टेंबर 2023ला भक्तिमय वातावरणात संपन्न झालं. एकूण 66 हजार 785 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्‍यातील 27 हजार 564 घरगुती गणेश मूर्ती तर 172 सार्वजनिक अशा एकूण 27 हजार 736 मूर्ती ह्या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या.

एकूणच, कृत्रिम विसर्जन स्‍थळांना दरवर्षी भाविकांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांनी यापुढील विसर्जन दिवसांमध्ये कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करून पर्यावरणाचे रक्षण करण्यास हातभार लावावा, असे विनम्र आवाहन उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी प्रशासनाच्या वतीने केलं आहे.