घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश

Ghatkopar Hoarding Collapsed :  सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

Updated: May 14, 2024, 09:10 PM IST
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश title=
Ghatkopar Hoarding Collapses

Ghatkopar Hoarding Collapsed: मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगखाली अडकले होते. पावसाळा सुरु होण्याआधीच घडलेल्या दुर्घटनेने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.  मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) प्रदर्शित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची परवाना घेतलेला नाही, अशा सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली, त्याठिकाणी आयुक्त गगराणी यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून मदत कार्याची पाहणी केली. संपूर्ण परिसराची पाहणी करतांनाच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी  दुर्घटनेशी संबंधित तपशील जाणून घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश

प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना आयुक्त गगराणी म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. विनापरवाना तसेच धोकेदायक स्थितीतील जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

तत्काळ निष्कासन कारवाई 

छेडा नगर येथील दुर्घटना घडलेल्या ठिकाणी असलेले अन्य तीन अनधिकृत होर्डिंग्जवर देखील तत्काळ निष्कासन कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. सदर ठिकाणी महानगरपालिकेची विहित परवानगी न घेता जाहिरात फलक उभारल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. 

 प्रशासनाने केला पाठपुरावा 

जमीन मालकी कोणाचीही असली तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करून लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या जागेतील अनधिकृत जाहिरात फलक तसेच परवाना या मुद्द्यावर वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रशासनाने पाठपुरावा केल्याचेही आयुक्त गगराणी यांनी अधोरेखित केले. या पाहणीप्रसंगी सह आयुक्त (आयुक्त कार्यालय)  चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त (परिमंडळ ६) रमाकांत बिरादार, उपआयुक्त (विशेष) (प्रभारी) किरण दिघावकर, सहायक आयुक्त (एन विभाग)  गजानन बेल्लाळे आदी उपस्थित होते.