वाडियाचं थकित अनुदान आजच द्या, स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

वाडिया रुग्णालयाची थकीत अनुदानाची रक्कम आजच्या आज द्या, असे आदेश

Updated: Jan 14, 2020, 03:04 PM IST
वाडियाचं थकित अनुदान आजच द्या, स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश  title=

मुंबई : वाडिया रुग्णालयाची थकीत अनुदानाची रक्कम आजच्या आज द्या, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.त्यामुळे २१ ते २२ कोटी रुपयांची रक्कम आज वाडिया रूग्णालयाला दिली जाणार आहे. वाडिया रुग्णालयाच्या मते मात्र १३५ कोटींची थकबाकी आहे. पण प्रत्यक्षात इतकी थकबाकी नसल्याचे जाधव यावेळी म्हणाले. 

२०१० च्या सूत्रानुसार म्हणजे ६०७ बेडनुसार आम्ही खर्च देत आहोत, परंतु वाडिया रूग्णालयाने बेडची संख्या ८३० वर नेली असून त्यानुसार ते खर्च मागत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. 

वाडिया रुग्णालयात डबल पगाराचा मुद्दा महापालिकेनं उपस्थित केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. वाडियाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांचाही डबल पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. डबल पगाराचा मुद्दा  आत्ताच का काढला गेला? असा सवाल त्यांनी केलाय.

वेतनासह सर्व निर्णय ट्रस्टचं बोर्ड ठरवतं आणि या बोर्डवर पालिकेचे प्रतिनिधीही असतात, असं बोधनवाला यांचं म्हणणं आहे. त्यांच्या सहमतीनंच हे निर्णय होत असल्याचा दावाही बोधनवाला यांनी केलाय. 

पुरेसा निधी नसल्यामुळे मुंबईतल्या वाडिया रुग्णालयात अवकळा सुरू असताना वाडियातल्या अनेक वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दोन्ही रुग्णालयांमधून डबल पगार सुरू आहे. वाडिया रुग्णालयाचे सहा कर्मचारी दोन्ही रुग्णालयातून वेतन आणि मानधन घेत असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

तसंच डबल पेन्शन घेणारे १० कर्मचारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. निधीची कमतरता असताना काही कर्चमाऱ्यांना डबल पगार कसा काय दिला जातो? असा प्रश्न उपस्थित होतोय. अशा अनेक प्रकारच्या अनियमितता वाडिया रुग्णालयात असल्याचंही काकाणी यांनी सांगितलंय.