मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेग मर्यादेचं पालन करा; अन्यथा...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाडी चालवण्याच्या नियमांमध्ये 'हे' बदल...

Updated: Jul 23, 2020, 05:43 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेग मर्यादेचं पालन करा; अन्यथा... title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर Mumbai-Pune expressway गाडी चालवण्याच्या नियमांमध्ये 1 ऑगस्टपासून काही बदल केले जात आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि पुणे जिल्ह्यातील उर्स टोल प्लाझा दरम्यान जवळपास 50 किलोमीटर अंतर आहे आणि कोणत्याही वाहनाने निर्धारित गती मर्यादा पार करण्यासाठी 37 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. या वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड आकारला जाईल आणि त्यांना ई-चालान पाठवण्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्टपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेग मर्यादेचं Speed Limit पहिल्यांदा उल्लंघन केल्यानंतर 1000 रुपये दंड लावण्यात येईल. तसंच चालकाने अनेकदा या वेग मर्यादेचं उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढत जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

सहा लेन असणाऱ्या मुंबई-पुणे एक्सस्प्रेस वेवर अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. या अपघातांमागे अनेकदा गाडीचा अति वेग हे कारण असल्याचं समोर आलं आहे. 94 किलोमीटर लांब असलेल्या या मार्गावर वेग मर्यादा ताशी 100 किलोमीटर इतकी ठेवण्यात आली आहे.

जवळपास 15 किलोमीटरचा घाट मार्ग त्यातून वगळलेला आहे. तेथे वेग मर्यादा ताशी 50 किलोमीटर ठरवण्यात आली आहे. महामार्ग पोलिसांना आपल्या परीक्षणात आढळलं की, सामान्यपणे गाडी चालवताना 50 किलोमीटरचा मार्ग कमीत-कमी 37 मिनिटांमध्ये पार केला जाऊ शकतो. जर एखाद्या वाहनाने कमी वेळात हे अंतर कापलं असेल तर याचा  स्पष्ट अर्थ असा आहे की, चालकाने निर्धारित वेग मर्यादेचं उल्लंघन केलं आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तसंच इतरही वेळेला गाडी चालवताना वेगाची मर्यादा पाळणं गरजेचं आहे. वाहतूकीच्या नियमांचं सर्वांनीच पालन केल्यास महामार्गांवर होणाऱ्या जीवघेण्या दुर्घटना, अपघात कमी होण्यास नक्कीच मदत होईल.