हिरेन मनसुख मृत्यू प्रकरण : फडणवीसांनी पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतल्याने खळबळ

राज्यात पुन्हा एकदा खळबळ...

Updated: Mar 5, 2021, 05:25 PM IST
हिरेन मनसुख मृत्यू प्रकरण : फडणवीसांनी पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतल्याने खळबळ title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटक आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात या गाडीचे मालक हिरेन मनसुख यांची गाडी काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. अशी माहिती मनसुख हिरेन यांनी दिली होती. पण आता गाडीचे मालक हिरेन मनसुख यांचाच मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्रीपासून ते बेपत्ता होते. आज ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सकाळी ठाण्याला तक्रार दिली होती. पण आता त्यांचा मृतदेह हाती लागल्याने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधीमंडळात तातडीने चौकशीची मागणी केली आहे. फडणवीसांनी म्हटलं की, 'मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली, याचे प्रकरण एनआयएकडे द्यावी. मनसुख हिरेन नेमके कुणाला कॉफर्ड मार्केटला भेटले?. सचिन वझे हेच तिथं पहिल्यांदा पोहचले होते. तेच तपास अधिकारी होते. गाडी मालक व सचिन वझे यांचे जून, जुलैमध्ये संभाषण झालंय. दोघेही ठाण्याचेच आहेत. यातून संशय तयार झाला. महत्वाचा दुवा हा मनसुख हिरेन होते व त्यांचीच डेथ बॉडी मिळाली आहे. या प्रकरणामध्ये गौडबंगाल आहे. तात्काळ ही केस एनआयएकडे वर्ग करायला हवी.'

गृहमंत्री याबाबतीत स्पष्ट भूमिका का मांडत नाहीत?. ज्या गोष्टी मला समजतात, त्या गृहमंत्र्यांना समजत नाहीत का? गाडी मालक व सचिन वझे यांची ओळख असणे हे गंभीर आहे. पहिल्यांदा या प्रकरणाच्या खोलापर्यंत जावं लागेल. असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.