Corona Update : भारतीयांना बुस्टर डोस घ्यावा लागणार? ICMR शास्त्रज्ञाने दिलं उत्तर

जगभरात कोरोनाचा बूस्टर डोस देण्याविषयी जोरदार चर्चा आहे. अशात भारतात  ICMR शास्त्रज्ञाने महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे

Updated: Nov 21, 2021, 11:25 PM IST
Corona Update : भारतीयांना बुस्टर डोस घ्यावा लागणार? ICMR शास्त्रज्ञाने दिलं उत्तर title=

मुंबई : जगभरातच नाही तर भारतातही कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस (Covid-19 Vaccine Booster Shots) द्यावा की नाही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस कोविड लसीच्या बूस्टर डोसबाबत धोरण जाहीर केलं जाऊ शकतं. काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली आहे. अशात प्रश्न असा उपस्थित होतो की बूस्टर डोसची खरोखर गरज आहे का? प्रत्येकाकडे तो देणं आवश्यक आहे का? सरकारचा अजेंडा काय आहे? इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या शास्त्रज्ञांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

देशातील अनेक तज्ज्ञांनी बूस्टर डोस देण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला विशेषतः ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब सारखा आजार आहे त्यांच्यासाठी दिला जात आहे. तसंच दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनाही बुस्टर डोसची आवश्यकता असल्याचं म्हटलं गेलं आहे.

पण सध्या. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार केंद्राचं लक्ष प्रत्येकाला लसीचा किमान एक डोस देण्यावर आहे. हे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यासाठी ‘हर घर दस्तक’हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकाचं लसीकरण करून घेणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

बूस्टर डोसची आवश्यकता किती?
ICMR मधील एपिडेमियोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ समीरन पांडा यांनी सांगितले आहे की भारतातील सध्याची कोरोनाची स्थिती पाहता देशात बूस्टर डोसची गरज नाही.

पांडा म्हणाले, 'आरोग्य मंत्रालय कोणताही निर्णय हा शास्त्रीय आधारावर घेतं. यामध्ये NTAGI मंत्रालयाला मार्गदर्शन करतं.  कोणतेही धोरण बनवण्यापूर्वी संबंधित विभाग आणि मंत्रालयांचं मत घेतले जाते. ते पूर्णपणे वैज्ञानिक आधारावर आहे. आणि सध्या देशातील वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर सांगायचं झाल्यास बूस्टर डोसची गरज नाही.

सध्या प्राथमिकता कोणत्या गोष्टीला?
सध्या बूस्टर डोसपेक्षा ८० टक्के लोकसंख्येला कोरोनाचे दोन्ही डोस देण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं डॉ. समीरन पांडा यांनी म्हटलं आहे. लसीकरण कार्यक्रमावर भर देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

काय आहे टार्गेट?
नॅशनल टास्क फोर्सच्या वरिष्ठ सदस्याने सांगितले की, लसीकरण मोहिमेत प्रथम प्रौढ लसीकरण कार्यक्रम पूर्ण करणे हे प्राधान्य असेल. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) धोरणांना अंतिम रूप देईल. भारतात  साथीच्या परिस्थितीवर आधारित तपशीलवार धोरण लवकरच येणार आहे अशी माहितीही टास्क फोर्सने दिली आहे. सध्या  ३१ डिसेंबरपर्यंत सर्व प्रौढ व्यक्तींचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट्य ठेवण्यात आलं आहे.