मुंबई : लालबागमधील गॅस स्फोट प्रकरणानंतर घरगुती गॅस वापरण्यासंदर्भातील नियम अधिक कठोर करण्यात आलेयत. त्यामुळे तुम्ही गॅस सिलिंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. परवानगी पेक्षा अधिक गॅस सिलिंडर आढळल्यास मुंबई महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. यामध्ये सिलिंडर जप्तीसह दंडात्मक कारवाई होऊ शकते. दोन पेक्षा अधिक सिलेंडरचा वापर किंवा साठा करायचा असेल तर परवानगीनुसार करणं बंधनकारक असणार आहे.
सिलेंडर हे अधिकृत गॅस वितरकाकडूनच अधिकृतपणे खरेदी करावेत. सिलेंडर घेताना लिकेज नसल्याची खातरजमा अधिकृत व्यक्तीकडून करून घ्यावी. लिकेज असल्यास सिलेंडर बदलून घ्यावा अशी सूचना ग्राहकांना देण्यात आलीय.
तसेच सिलेंडरचा साठा, वापर काळजीपूर्वक करावा, तो बंदिस्त जागी ठेवू नये. सिलेंडर आडवा ठेवल्यास तो लिकेज होण्याची शक्यता असते. महत्वाचे म्हणजे सिलेंडरजवळ आग भडकवणाऱ्या वस्तू ठेवू नयेत असे आवाहन करण्यात आलंय. सिलेंडर, रेग्युलेटर, पाइप, गॅस शेगडी यांची जोडणी अधिकृत व्यक्तीकडूनच करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलंय.