डू नॉट से यू आर वीक, बिकॉझ यू आर वूमन... डुडलद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा

डुडलासाठी हे १३ संदेश निवडण्यामागील भूमिकाही गुगलकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

Updated: Mar 8, 2019, 07:55 AM IST
डू नॉट से यू आर वीक, बिकॉझ यू आर वूमन... डुडलद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा title=

मुंबई: संपूर्ण जगभरात आज ( ८ मार्च) महिला दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने गुगलच्या होमपेजवर एक खास डुडल झळकत आहे. या डुडलमध्ये महिलांच्या सामर्थ्याची प्रचिती आणून देणाऱ्या संदेशांचा एक स्लाईड शो तयार करण्यात आलाय. गुगलने नेहमीच्या सृजनशील आणि कलात्मक पद्धतीने हे संदेश मांडले आहेत. १३ विविध भाषांमधील हे संदेश महिलांचे आंतरिक सामर्थ्य आणि दृढपणा अधोरेखित करणारे आहेत. डुडलासाठी हे १३ संदेश निवडण्यामागील भूमिकाही गुगलकडून स्पष्ट करण्यात आली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डुडलसाठी १३ संदेश निवडण्याची प्रक्रिया खूपच अवघड होती. मात्र, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ असे व्यापक भान ठेवून जगभरातील महिलांच्या विविध भूमिकांचे दर्शन घडेल, या हेतूने आम्ही या १३ संदेशांची निवड केल्याचे गुगलने म्हटले. 

या डुडलमध्ये भारताची बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकारी बेनो जेफाईन यांच्या प्रेरणादायी वाक्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबईतील चित्रकार सबिना कर्णिक या महिला दिनाचे डुडल तयार करणाऱ्या डिझायनिंग टीमच्या भाग होत्या. नेहमीप्रमाणे हे डुडल अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. 

डुडल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, भारतातही आज महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज दिवसभरातील सर्व १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमानांचे सारथ्य केवळ महिला पायलट करणार आहेत. त्याचबरोबर विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.