कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी; धावत्या लोकलमधे चोरी करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

Mumbai News in Mararthi: कल्याण ते बदलापूरमध्ये धावत्या लोकलमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना या चोरट्यांना रंगेहाथ पकडलं आहे. पोलीस सध्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

आकाश नेटके | Updated: Aug 24, 2023, 04:13 PM IST
कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी; धावत्या लोकलमधे चोरी करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या title=

Mumbai News Today: धावत्या लोकल (Mumbai local) ट्रेनमध्ये खिसे कापणाऱ्या आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीला कल्याण रेल्वे पोलिसांनी (Kalyan Railway Police) रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदलापूर ते कल्याण या स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये खिसे कापण्याच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई करत चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे.

कल्याण रेल्वे पोलिसात या संदर्भात तक्रारी आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. गेल्या एक ते दोन आठवड्यापासून हे पथक कल्याण ते बदलापूर दरम्यान पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान त्यांना दोन जण हे धावत्या लोकलमध्ये खिसे कापत असल्याचे कळालं. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ अटक केले .तर आणखी दोन जणांना त्यांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले .त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात मोबाईल आढळून आले .अतुल वाघमारे विशाल शिखरकर ,राजेश यादव आणि गार्डी पकडे असे या टोळीतील आरोपींची नावे आहेत .दरम्यान या चारही आरोपांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

"कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान पाकिटमार चालू ट्रेनमध्ये चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. सात दिवसांपासून आम्ही या सगळ्यावर लक्ष ठेवून होतो. त्यावेळी आम्हाला चार संशयित इसम मिळाले. आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली. त्यातील दोघांना आम्ही रंगेहाथ पकडलं. फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघांमध्ये चोरी गेलेले मोबाईल सापडले आहेत. त्यांचे साथीदार कोणी आहेत का याचाही तपास करण्यात येत आहे," अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकारी सुहास पवार यांनी दिली.

फेरीवाला बनून प्रवाशांना लुटणाऱ्यांना अखेर अटक

धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये फेरीवाला बनून प्रवाशांचे मोबाईल, पर्स आणि दागिने चोरणाऱ्या टोळीला मुंबई रेल्वे एसटीएफ पथकाने अटक केली आहे. रामेश्वर साहनी, खूबलाल महतो, विनोद महतो अशी अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 17 मोबाईल, महागडी घड्याळं यासह जवळपास नऊ लाखांचा चोरीचा माल जप्त केला आहे. एका महिला प्रवाशाची लूट केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पूर्णिमा बेन शर्मा या महिला 13 एप्रिल रोजी एर्नाकुल्लम निजामउद्दीन या एक्सप्रेस प्रवास करीत होत्या. प्रवासात त्या वाशरूममध्ये गेल्या तेव्हा त्यांची पर्स सीटवर होती. त्या परत आल्या तर त्यांची पर्स त्या जागेवरून गायब होती. त्यांच्या पर्समध्ये मोबाईल, एटीएम कार्ड आणि दागिने होते. या प्रकरणी त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत टोळीचा शोध सुरु केला. अखेर या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे.