घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा आणि मामीचा मृत्यू

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Collapse) मृतांमध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे (Karthik Aryan) नातेवाईकही आहेत. कार्तिक आर्यनच्या काका आणि काकींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, त्याने अंत्यसंस्काराला हजेरी लावत अंतिम दर्शन घेतलं.   

शिवराज यादव | Updated: May 17, 2024, 02:06 PM IST
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा आणि मामीचा मृत्यू title=

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Collapse) 16 जणांचा मृत्यू झाला असून, 74 जण जखमी आहेत. या मृतांमध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचेही नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. कार्तिक आर्यनच्या मामा-मामीने दुर्घटनेत जीव गमावला आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून कार्तिक आर्यनने हजेरी लावत अंत्यदर्शन घेतलं. दरम्यान या दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने अटक केली आहे. 

बुधवारी घटनास्थळावरुन दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. हे दोन्ही मृत व्यक्ती कार्तिक आर्यनचे नातेवाईक होते. कार्तिक आर्यनने गुरुवारी त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. मृतांची ओळख एअर ट्राफ्रिक कंट्रोलचे निवृत्त जनरल मॅनेजर मनोज चनसोरिया आणि त्यांची पत्नी अनिता अशी झाली आहे. दोघेही कार्तिक आर्यनचे काका-काकी होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चाहतेही कार्तिक आर्यनच्या कुटुंबाप्रती शोक व्य्कत करत आहेत.

मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दुर्घटनेसाठी जबाबदार ठरलेला मुख्य आरोपी भावेश भिंडेला (Bhavesh Bhinde) अखेर अटक केली आहे. भावेश भिंडे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Ego Media Pvt Ltd) कंपनीचा मालक असून, त्याच्याच कंपनीने हे होर्डिंग लावलं होतं. दुर्घटनेनंतर फरार असणाऱ्या भावेश भिंडेला अखेर 3 दिवसांनी अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या उदयपूरमधून गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच कसून त्याचा शोध घेत होती. अखेर क्राईम ब्रांचला यश मिळालं असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. 

13 मे रोजी संध्याकाळी घाटकोपरमध्ये 120 फुटांचं होडिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेकांना पेट्रोल पंपाच्या खाली आश्रय घेतला होता. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 75 जण जखमी झाले आहेत. दुर्घटना घडताच भावेश भिंडे आपल्या कार चालकासह फरार झाला होता. भावेश भिंडेचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची 8 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली होती. अखेर राजस्थानच्या उदयपूरमध्ये तो सापडला असून, पोलिसांनी अटक केली आहे.