येऊरमध्ये सापडलेल्या 'त्या' बछड्याला व्हीआयपी ट्रीटमेंट

एरवी बिबट्याचे नवजात पिल्लू आईपासून जास्त दिवस दूर राहिल्यास फार काळ जगत नाही.

Updated: Dec 22, 2019, 10:38 AM IST
येऊरमध्ये सापडलेल्या 'त्या' बछड्याला व्हीआयपी ट्रीटमेंट title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई: काही दिवसांपूर्वी ठाण्यानजीक असणाऱ्या येऊरच्या जंगलात वनविभागाला आईपासून दुरावलेला बिबट्याचा बछडा सापडला होता. अनेक दिवस प्रयत्न करूनही बिबट्याची आई परत न आल्याने या बछड्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून हा बछडा संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा बछडा अवघ्या २१ दिवसांचा असल्यामुळे त्याची २४ तास डोळ्यात तेल घालून देखभाल केली जात आहे. 

येऊरच्या जंगलात ४ डिसेंबरला हा बछडा सापडला होता. अवघ्या काही दिवसांच्या या बछड्याला आईने परत घेऊन जावे, यासाठी वनविभागाने काही दिवस वाटही पाहिली. मात्र, या बछड्याची आई न परतल्याने आता नॅशनल पार्कच्या रेस्क्यू टीमकडून त्याला आईची माया दिली जात आहे.

मुसळधार पावसाने ताटातूट, बिबट्याचे पिल्लू चक्क आसऱ्यासाठी घरात घुसले

या बछड्याचे वजन अवघे ३८० ग्रॅम आहे. एरवी बिबट्याचे नवजात पिल्लू आईपासून जास्त दिवस दूर राहिल्यास फार काळ जगत नाही. त्यामुळे रेस्क्यू टीम दिवसरात्र बछड्याच्या तब्येतीची काळजी घेताना दिसत आहे. या टीमकडून सहा वेळेस फिडिंग, बछड्यासाठी स्पेशल रेस्ट होऊस, रूममध्ये थंडीचा त्रास होऊ नये म्हणून हिटर, वूलनचे कपडे, खास सोय करण्यात आली आहे. तसेच बछड्याच्या देखभालीसाठी २४ तास एक प्राणीरक्षक तैनात असतो. 

गेल्या तीन वर्षांमध्ये नॅशनल पार्क रेस्क्यू टीमने चार बछड्यांना जीवनदान दिले आहे. मात्र, आताचा बछडा बराच लहान असल्याने त्याची प्रकृती अजूनही नाजूक आहे. त्यामुळे रेस्क्यू टीमकडून बछड्याला जीवनदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.