'CAA रद्द करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून ठराव मंजूर करा'

केरळच्या विधानसभेत मंगळवारी वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला.

Updated: Dec 31, 2019, 04:07 PM IST
'CAA रद्द करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून ठराव मंजूर करा' title=

मुंबई: नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केली आहे. केरळ सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नसीम खान यांनी ही मागणी केली. केरळच्या विधानसभेत मंगळवारी वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला. नसीम खान यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच ठाकरे सरकारने याच धर्तीवर नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, असे नसीम खान यांनी म्हटले. 

नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात आल्यापासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. अनेक राज्यांनी या कायद्याला विरोध दर्शविला होता. मात्र, केरळने या सगळ्यावर कडी करत आज विधानसभेत CAA विरोधी ठरावच मंजूर केला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा प्रस्ताव विधानसभेत मांडला. 

मुळात हे विशेष अधिवेशन अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. मात्र, CAA हा गेल्या काही दिवसात कळीचा मुद्दा झाल्याचे सांगत हा विषय पटलावर आणण्यात आला. 

हा ठराव पटलावर मांडताना पिनराई विजयन यांनी म्हटले की, CAA कायदा सेक्युलर दृष्टीकोन आणि सामाजिक वीण उसवणारा आहे. त्यामुळे देशात धार्मिक आधारावर भेदभाव सुरु होईल, अशी भीती पिनराई विजयन यांनी व्यक्त केली.