कंबरेतून घुसलेली सळई उजव्या पायाच्या जांघेतून बाहेर निघाली; ठाण्यात विचित्र अपघात

Man Fall On Iron Rod Went Through Legs: या तरुणाचा अपघात नेमका कसा झाला? तो कसा काय पडला याबद्दलचा तपास सुरु असला तरी तो एवढ्या भीषण अपघातातून बचावल्याने तो सुदैवी असल्याचं म्हटलं जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 15, 2024, 09:19 AM IST
कंबरेतून घुसलेली सळई उजव्या पायाच्या जांघेतून बाहेर निघाली; ठाण्यात विचित्र अपघात title=
रविवारी रात्री वर्तकनगरमध्ये घडली ही घटना

Man Fall On Iron Rod Went Through Legs: ठाण्यामधील वर्तकनगर परिसरात एक विचित्र अपघात घडला आहे. येथील रौनक रेसीडन्सी नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरु असून याच बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी हा विचित्र अपघात घडला. इमारत उभारण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी सळयांवर एक 19 वर्षीय तरुण एवढ्या जोरात पडला की एक सळई त्याच्या कंबरेखालून घुसून उजव्या पायाच्या थेट जांघेतून बाहेर निघाली. एवढ्या गंभीर दुखापतीनंतरही हा तरुण शुद्धीत होता हे विशेष. या तरुणाला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

हा तरुण तिथं काम करत नाही

रविवारी रात्री अचानक रौनक रेसीडन्सीच्या निर्माणाधीन साईटवरील सुरक्षारक्षकाला एक तरुण बांधकामाच्या साचासाठी लावलेल्या लोखंडी सळ्यांवर पडल्याचं दिसून आलं. या सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जखमी तरुण या साईटवर कामगार म्हणून काम करत नाही. इमारतीवरुन थेट खाली उभ्या केलेल्या सळयावर पडलेल्या या तरुणाच्या डाव्या बाजूने कंबरेतून आत शिरलेली सळई मांडीमधून बाहेर पडून थेट उजव्या बाजूच्या जांघेतून शिरुन बाहेर आली. 

तपास सुरु

हा अपघात झाल्याचं समजताच सुरक्षारक्षकाने इतर कामगारांना तिथे बोलवला. या कामगारांनी प्रसंगावधान दाखवत ग्राइंडर मशीनच्या मदतीने या तरुणाच्या शरीरात घुसलेली सळई मुख्य साचापासून वेगळी केली. या तरुणाला दूर आणून रुगणवाहिकेतून खासगी रुग्णालयात उपाचारांसाठी नेण्यात आलं आहे. तरुणावर उपचार सुरु असून याबद्दल पोलिसांनाही कळवण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून हा तरुण तिथे कामाला नव्हता तर नेमकं काय करत होता? कसा पडला? त्याला कोणी धक्का दिला का? यासारख्या प्रश्नांचा शोध पोलीस घेत असून उपचारांनंतर या तरुणाची चौकशी केली जाणार आहे. 

काही महिन्यांपूर्वीच लिफ्ट पडून 6 जणांचा झालेला मृत्यू

अशाप्रकारे ठाण्यात निर्माणाधीन ठिकाणी अपघात घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी 10 सप्टेंबर रोजी ठाण्यातील बाळकुम परिसरातील एका 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली होती. या दुर्घटनेत 6 जण जागीच ठार झाले होते. तर, 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर यंत्रणांना खडबडून जाग आली होती. या प्रकरणामध्येही मरण पावलेले सर्वजण कामगारच होते. तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला होता.