'म्हणून सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या' मंगेश साबळे यांनी कारण सांगत दिला इशारा, म्हणाले यापुढे जर...

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्या. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. जामीन दिल्यानंतर सदावर्तेंची कार का फोडली यांचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. 

कपिल राऊत | Updated: Oct 26, 2023, 07:39 PM IST
'म्हणून सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या' मंगेश साबळे यांनी कारण सांगत दिला इशारा, म्हणाले यापुढे जर... title=

Maratha Reservation :  अॅड. गुणरत्न सदावर्तें  (AD. Gunratne Sadavarte) यांच्या गाड्यांची मुंबईत मराठी क्रांती मोर्चाच्या तरुणांनी तोडफोड केली. एक मराठा लाख मराठा  शा घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्यात.. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या आरोपींना ताब्यात घेतलं. न्यायालयानं 5 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामीनावर सुटका केली. सदावर्ते मराठा आंदोलनाचा वारंवार अपमान करत असल्यामुळे आपण सदावर्तेंच्या गाड्या फोडल्याची कबुली या प्रकरणातील आरोपी मंगेश साबळे (Mangesh Sable) यांनी दिलीय. 

सदावर्ते यांच्या गाडया फोडणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मंगेश साबळे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर झी 24 तासला पहिली प्रतिक्रिया दिलीय. मराठा आरक्षणाला गालबोट लावण्याचा हेतू नव्हता असा दावा साबळेंनी केलाय.

काय म्हणाले साबळे
मराठा समाजाचं आंदोलन शांततेत सुरु आहे. या आंदोलनाला गालबोट लावण्याचा आमचा प्रयत्न नाही. पण मराठा समाजा माजोरडा आहे, मराठा समाजाला मी आरक्षण मिळूच देणार नाही, मराठा समाजाची सभा ही जत्रा आहे असं, सातत्याने बोलून आमच्या भावना दुखावण्याचं काम गुणरत्न सदावर्ते करतायत. म्हणून त्या व्यक्तीला चाप लावण्याचं काम आम्ही केलंय. आमच्याकडून कायदा मोडला गेला असेल तरी लाखो करोडो मराठ्यांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. लाखो-करोडो मराठांच्या मानसन्मानाचा हा प्रश्न आहे असं मंगेश साबळे यांनी म्हटलंय. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांच्या आई-बहिणीकडे कधी वळूनसुद्धा बघितलं नाही, त्या छत्रपतींच्या मराठ्यांना माजोरडा म्हणणं हे महागात पडेल हे दाखवून देण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे. शासनाने टिकणारं आरक्षण दिलं नाही, तर अन्न-पाणी त्याग करुन आम्ही उपोषणाला बसणार आहे. मराठा समाजाचं शातंतेत सुरु असलेलं आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत सुरु राहाणार आहे. टिकणार आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहाणार नाही असा इशाराही मंगेश साबळे यांनी दिला आहे.

सदावर्तेंचा जरांगेंवर आरोप
गाड्यांच्या तोडफोड झाल्यानंतर सदावर्तेंनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange Patil) निशाणा साधलाय. मनोज जरांगेंना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी सदावर्तेंनी केलीय.  हल्ला माझ्या घरापर्यंत येऊन ठेपलाय, माझ्या घराची रेकी करण्यात आली. हीच का शांततामय आंदोलनाची व्याख्या असा सवाल सदावर्तेंनी विचारलाय. तर तोडफोडीचं समर्थन आपण करणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.