आमदार अपात्रतेचा निकाल देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा- ठाकरे

MLA Disqualification: उद्या दहा जानेवराली 11:59 पर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असं वाटतं, असा खोचक टोला ठाकरेंनी यावेळी लगावला. 

Updated: Jan 9, 2024, 01:19 PM IST
आमदार अपात्रतेचा निकाल देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा- ठाकरे  title=

MLA Disqualification: हा खटला आहे ते देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा निकाल असेल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्री-विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेले दोन वर्ष त्यावर चर्चा, सुनावणी, उलट तपासणी सुरू आहे. गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत निकाल लावावा असं म्हटलं होतं. 31 डिसेंबर तारीख दिली होती. ज्याप्रमाणे सुनावणी सुरू होती तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की वेळकाढूपणा करत आहेत. उद्या दहा जानेवराली 11:59 पर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असं वाटतं, असा खोचक टोला ठाकरेंनी यावेळी लगावला. 

लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत. याचा अर्थ होतो की आरोपीच न्यायाधिशाला जाऊन भेटले. ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले. आरोपीला घरी जाऊन भेटणार असतील तर कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत तुम्ही ऐकायला हवी. ते सांगत आहेत की किती वेळ काढला जात आहे. लोकशाहीचा खून यामुळे होतोय की काय अशी परिस्थिती आहे. त्यात ते उघड उघड भेटत आहेत.आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की तुमच्या डोळ्यादेखत हे घडत आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

आमदार अपात्रता निकाल 10 जानेवारीला दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही, काही तथ्य नाही.अध्यक्षांकडे हिअरींग झाली, आता निकाल येईल. बहुमताला लोकशाहीत महत्त्व आहे.विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आहे. आमच्याकडे अधिकृत चिन्ह आहे.मेरीटप्रमाणे निकाल अपेक्षित आहे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही.घटनाबाह्य काम आम्ही केलेलं नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय अध्यक्ष घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमचे शिवसेनेच अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केलंय. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.