आठवले, जानकरांच्यामागे राज ठाकरेंचा फोटो, मनसे कार्यकर्ते नाराज

Raj thackeray Photo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Apr 13, 2024, 08:28 PM IST
आठवले, जानकरांच्यामागे राज ठाकरेंचा फोटो, मनसे कार्यकर्ते नाराज title=
Raj Thackeray Photo Controversy

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पाठींबा दिला असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरे आणि मनसे महायुतीचा प्रचार करताना दिसणार आहे. 

आता महायुतीच्या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बॅनर दिसू लागले आहेत. दरम्यान भाजप - मनसेत राज ठाकरे यांच्या फोटोवरून वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांचा फोटो बॅनरवर सन्मानजनक ठीकाणी लावा अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कुठे घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा महायुती संकल्प मेळावा पार पडला. येथे स्टेजवर लावण्यात आलेला बॅनर चर्चेच राहिला. या बॅनरमुळे मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी महायुती संकल्प मेळाव्याच्या ठिकाणी भेट दिली. तेथे भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नयन कदम यांनी त्यांना खडे बोल सुनावले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या फोटोला सन्मानजनक वागणुक द्या, अशी विनंती यावेळी मनसेकडून करण्यात आली. राज ठाकरेंचा सन्मानजनक फोटो असला पाहीजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

महायुतीच्या संकल्प मेळाव्याच्या बॅनरवरून मनसेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सन्मानजनक फोटो बॅनरवर लावा अन्यथा लावु नका, असे आवाहन नयन कदम यांनी केले. रामदास आठवले , महादेव जानकर यांच्या मागे राज ठाकरेंचा फोटो लावल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. सन्मानजनक फोटो लावा अन्यथा लावू नका. आम्ही तुम्हाला पाठींबा जाहीर केलाय, असेही यावेळी भाजप कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.