MNS Padwa Melava: "फडणवीससाहेब तुम्हाला अजित पवारांनी..."; मनसे मेळाव्याच्या मंचावरुन फडणवीसांना इशारा

MNS Padwa Melava 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा यंदा शिवाजीपार्कवर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये आपल्या भाषणादरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी हा इशारा दिला.

Updated: Mar 22, 2023, 08:14 PM IST
MNS Padwa Melava: "फडणवीससाहेब तुम्हाला अजित पवारांनी..."; मनसे मेळाव्याच्या मंचावरुन फडणवीसांना इशारा title=
MNS Padwa Melava

MNS Padwa Melava 2023: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दसरा मेळावा आज मुंबईमधील दादर येथील शिवाजीपार्क मैदानामध्ये पार पडत आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज गुढीपाडव्यानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. राज ठाकरे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळावर लढण्याची घोषणा करणार की युतीच्या गुढीची मुहूर्तमेढ रोवणार हे या सभेमधून स्पष्ट होणार आहे. मात्र राज ठाकरेंचं भाषण सुरु होण्याआधी या सभेमध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते अजित पवारांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख

बाळा नांदगावकर यांनी राज्यामध्ये सध्या शिंदे आणि फडणवीस सरकार असल्याचा उल्लेख करत वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र या धोरणावर या सरकारची वाटचाल सुरु आहे असं म्हटलं. यानंतर नांदगावकर यांनी, "फडणवीससाहेब तुम्हाला अजित पवारांनी उजवा डोळा मारला होता. काल परवा उद्धव ठाकरे साहेबांना डावा डोळा मारला होता. तुम्हाला कल्पना असेल आता विरोधीपक्षात असले तरी ते काय करु शकतात याची तुम्हाला कल्पना आहे," असं म्हणत सूचक शब्दांमध्ये इशारा दिला.

हे वागणं बरं नव्हं

फडणवीस आणि शिंदेंबद्दल बोलताना, "तुम्ही मोठे निर्णय घेता, साहेबांना येऊन भेटता, त्यांची मदत घेता याचाही मोठा आनंद आहे. पण माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्हाला काय माणसं फोडायची आहे ती फोडा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माणसं फोडण्याचं पाप तुम्ही करु नका. हे वागणं बरं नव्हं," असं बाळा नांदगावकर म्हणाले. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी, "कारभारी दमानं, होऊ द्या दमानं" अशा लावणीच्या ओळीही म्हटल्या. "लक्षात ठेवा तुम्ही दमानं बोलाल पण टायगर जोमानं येणार आहे," असं नांदगावकर यांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या वाक्याला प्रतिसाद दिला.

लव्ह जिहादचाही उल्लेख

बाळा नांदगावकर यांनी या सभेमध्ये राज ठाकरेंकडे लव्ह जिहादविरोधी कार्यक्रम हाती द्यावा अशी मागणीही केली. "मी साहेबांना, राज्य सरकारला विनंती करणार आहे. साहेब लव्ह जिहादविरुद्ध आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. बाळासाहेबांनी एक कमांडोंची टीम स्थापन केली होती. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्याला तसेच काहीतरी करावं लागले. सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा ताबडतोब आणायला पाहिजे. नाहीतर काय साहेब आहेत." असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं.