प्रेमविवाह केला म्हणून जन्मदात्याकडून मुलीसह जावयाची हत्या; गोवंडीतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : मुंबईत एका निर्दयी बापाने मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे लेकीचा आणि जावयाचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 18, 2023, 08:53 AM IST
प्रेमविवाह केला म्हणून जन्मदात्याकडून मुलीसह जावयाची हत्या; गोवंडीतील धक्कादायक प्रकार title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : कुटुंबांच्या विरोधात जाऊन आंतरधर्मीय विवाह (Interfaith marriage) केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीची आणि जावयाची निर्घृणपणे हत्या केली आहे. आरोपी वडिलांनी मुलीची दगडाने ठेचून हत्या केली आहे. तर जावयाची चाकूने भोकसून हत्या केलाचा धक्कादायक प्रकार मुंबई (Mumbai Crime) गोवंडी परिसरात घडला आहे. पोलिसांनी (Mumbai Police) 10 तपास पथके तयार करुन याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात वडील गोरा खान, भाऊ सलमान खान व त्याचा दोन अल्पवयीन मित्रांना अटक केली आहे. यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का याविषयी पोलिसांकडून तपास केला जात आहे. या आरोपीना न्यायालयात हजर केले असताना त्यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी मुलासह मिळून मुलीची आणि जावयाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना देवनार परिसरात चार दिवसांपूर्वी घडली आहे. 14 ऑक्टोबरला देवनार गावातील टेलिकॉम फॅक्टरी परिसरात असलेल्या एका विहिरीत परिसरातील काही मुले पोहण्यासाठी गेली होती. यावेळी तिथे एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मृतदेहावर अनेक वार करण्यात आले होते.

पोलिसांच्या तपासात मयत तरुणाचे नाव करण चंद्र (22) असल्याची माहिती मिळाली. वर्षभरापूर्वी करणने गुलनाज खान (20) या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. गुलनाजच्या कुटुंबीयांचा या विवाहाला विरोध होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी धारावी परिसरातून मुलीचे वडील रइसउद्दीन खान (50) याला ताब्यात घेतले. तपासात रइसउद्दीन खानने गुन्ह्याची कबुली दिली आणि मुलीचीही हत्या केल्याचे सांगितले.

कशी झाली दोघांची हत्या?

गुलनाजच्या प्रेमविवाहामुळे खान कुटुंबिय अस्वस्थ होतं. त्यांचा या विवाहाला प्रचंड विरोध होता. याच विरोधातून त्यांनी दोघांनाही संपवण्याचा कट आखला होता. याच कटाचा भाग म्हणून आम्ही तुमच्या विवाहाला मान्यता देतोय असे सांगत सासऱ्याने करणला धारावीतल्या घरी बोलवलं. त्यानंतर काहीतरी खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याला सासऱ्याने देवनारला नेले आणि तिथे त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. चाकूहल्ला केल्यानंतर सासऱ्याने करणचा मृतदेह विहिरीत टाकला. त्यानंतर आरोपीने गुलनाजला कळंबोली परिसरातील एका निर्जन ठिकाणी नेत तिच्यावरही चाकूहल्ला केला. तिची ओळख पटू नये म्हणून वडिलांनीच तिचा चेहरा दगडाने ठेचला. 

पोलिसांनी काय सांगितले?

"14 ऑक्टोबर रोजी गोवंडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटवली असता तो करण रमेश चंद्र अशी असल्याची माहिती समोर आली. करण हा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी करणचा सासरा गोरा खान याला ताब्यात घेतलं. त्याच्यासोबत त्याचा मुलगा सलमान खान आणि त्याच्या साथीदारांनी मिळून करणचा खून केल्याचे समोर आलं आहे. तपासादरम्यान, मयताची पत्नी आणि आरोपीची मुलगी गुलनाज हिचाही खून करुन नवी मुंबई परिसरात मृतदेह टाकला होता. तो देखील आम्ही शोधून काढला आहे. करण आणि गुलनाज यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या प्रेमविवाहाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यातून हे कृत्य केल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यासोबत तीन अल्पवयीन मुलांनादेखील ताब्यात घेण्यात आलं आहे. तपासासाठी आम्ही दहा पथके तयार केली होती," अशी माहिती पोलीस आयुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी दिली.