धावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर

Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 15, 2023, 01:29 PM IST
धावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मुंबईकरांची (Mumbai News) लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local) तरुणांकडून हुल्लडबाजी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे पोलिसांकडून वारंवार सूचना केल्यानंतरही काही तरुणांकडून स्टंटबाजी करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशाताच स्वतःचा जीव धोक्यात घालून एक तरुण लोकल ट्रेनमध्ये स्टंट करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनमधल्या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (RPF) कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेमार्गावरील (Western Railway) लोकल रेल्वेतील स्टंटचा व्हिडीओ समोर आला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री 12 वाजताच्या सुमारास एक तरुण धावत्या लोकल ट्रेन मधून ट्रेनच्या शिडीवर उभा राहून स्टंट करत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विरार- चर्चगेट ट्रेनमध्ये हा जीवघेणा खेळ सुरु होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या स्टंटबाज तरुणावर पोलिसांनी कारावाई करावी अशी मागणी प्रवाशांमधून होतं आहे. इंन्स्टाग्रामवर रील्स बनवून प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात काही तरुण स्वतःच्याच जीवाशी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजीचा समोर आलेल्या व्हिडिओमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी मध्यरात्री चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तरुणाने अचानक ट्रेनच्या दरवाजाच्या पायऱ्यांवर उतरून स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी हा तरुण जीवाची पर्वा न करता सतत स्टंट करत होता. त्याला त्याच्या आजूबाजूच्या लोकांची पर्वा किंवा स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा नव्हती. दरम्यान, एका प्रवाशाने त्याचा व्हिडिओ बनवला.

व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण रेल्वेच्या दरवाजाच्या पायऱ्यांवर लटकत आहे. त्याने खांबाला धरले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यातही तो अतिशय मजेत स्टंट करताना दिसतो. वाऱ्याची जोरदार झुळूकही त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकते. त्याने खांब सोडला असता तर तो ट्रेनमधून पडला असता. मात्र कशालाही न घाबरता तो स्टंट करताना दिसत आहे.

दरम्यान, असाच एक व्हिडिओ चार दिवसांपूर्वी समोर आला होता. एक मुलगा एका ट्रेनच्या दरवाजाच्या चौकटीला धरून सतत स्टंट करत होता. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच या मुलाने ट्रेनमधून उडी मारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला आहे.