... असा पार पडला युवा आमदारांचा शपथविधी

राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात 

Updated: Nov 27, 2019, 12:21 PM IST
... असा पार पडला युवा आमदारांचा शपथविधी title=
... असा पार पडला युवा आमदारांचा शपथग्रहण सोहळा

मुंबई : राजकीय पटलावरच्या रंजक खेळीनंतर अखेर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाराष्ट्रविकासआघाडीची सत्ता स्थापन होत असल्याचं जाहीर करण्यात आलं. ज्यानंतर बुधवारी लगेचच मुंबईतील विधानभवनामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवार, प्रणिती शिंदे आणि आदिती तटकरे यांच्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. 

निवडणुकीच्या रिंगणात उतरणारी ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरे यांनी यावेळी आमदारकीची शपथ घेतली. 'मी आदित्य उद्धव ठाकरे.... ', असं म्हणत वरळी मतदार संघातून निवडून आलेल्या आदित्य़ ठाकरे यांनी आपल्या पदाची शपथ घेत एका नव्या कारकिर्दीची सुरुवात केली. 

 

ठाकरे कुटुंबातील या सदस्यासोबतच राज्याच्या राजकारणात प्रचंड दबदबा असणाऱ्या शरद पवार यांच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीनेही विधानभवनात आमदारकीची शपथ ग्रहण केली. कर्जत- जामखेड मतदार संघातून निवडून आलेल्या रोहित पवार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने विधानसभेच्या हंगामी सभापतींकडून आपल्या पदाची शपथ घेतली. 

 

सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे आणि सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनीही भारताच्या संविधानाबद्दलची श्रद्धा व्यक्त करत औपचारिकरित्या आमदारकीची शपथ ग्रहण केली. यंदाच्या वर्षी निवडणुका जाहीर झाल्यापासून या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणाने साऱ्या देशाचं लक्ष वेधलं. याच राजकीय घडामोडींमध्ये येत्या काळात राज्यातील हे विविध मतदार संघांचं प्रतिनिधित्वं करणारे आमदार आपल्या कामगिरीच्या बळावर साजेशी कामगिरी करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.