वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे

Bandra-Worli Sea Link : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर टोलवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असून 2027 पर्यंत हे दर लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सी लिंकवरुन प्रवास करताना आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत.

आकाश नेटके | Updated: Mar 30, 2024, 09:20 AM IST
वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे title=
(फोटो सौजन्य -Reuters)

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंक म्हणजेच राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतूवर 1 एप्रिल पासून टोल वाढ करण्यात येणार आहे. तब्बल 18 टक्के इतकी ही टोल वाढ असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. कार आणि जीपसाठी वन-वे ट्रिपचे यासोबत मिनीबस, टेम्पोसाठी नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांना शहराच्या दक्षिण भागातील जोडणारा हा सेतू महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हा निर्णय घेतला असून याची तात्काळ अंमलबजावणी एक एप्रिल पासून होणार आहे. माहिम, दादर, प्रभादेवी, वरळी भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पश्चिम उपनगरातील वाहनधारक या सागरी सेतूचा उपयोग करत असतात. तर याच सागरी सेतूला आता धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सागरी किनारा मार्गसुद्धा जोडण्यात येत आहे. हा सागरी किनारा रस्ता वांद्रे वरळी सेतूला जोडल्यास यावरुन जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे.

वांद्रे-वरळी सी लिंक या आठ पदरी पुलावरून जाण्यासाठी वन वे शुल्क कार आणि जीपसाठी 85 रुपये, मिनीबससाठी 130 रुपये आणि ट्रक आणि बससाठी 175 रुपये ठेवण्यात आले होते. मात्र या टोलवाढीमुळे सध्याच्या कार आणि जीपचे टोल 85 रुपयावरून शंभर रुपयावर जाणार आहे. तसेच मिनीबस, टेम्पो आणि तत्सम वाहनांसाठी 160 रुपये आकारले जातील. तर पुलावरून जाणाऱ्या ट्रकसाठी 210 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर एकेरी प्रवासासाठी 175 रुपये ऐवजी डबल एक्सेल ट्रक साठी 210 रुपये आकारले जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सी लिंकवरील टोल शुल्काचे नवीन दर 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील आणि 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहतील.

खेड-शिवापुर टोलनाक्यावरही दरवाढ 

दरम्यान, पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिल पासुन सुमारे अडीच टक्क्यांनी वाढीव टोल वसुली करण्यात येणार आहे. ठेकदार टोल रोड प्रशासनामार्फत याबाबतचं पत्रक प्रसिध्द करण्यात आल्याची माहीती विभागीय प्रमुख अमित भाटिया यांनी दिली आहे. टोलच्या वाढीव रकमेनुसार कार, जीपसह हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार आहे. आधी घेण्यात येणारा 115 रुपये दर आता 120 रुपये होणार आहे. हलक्या व्यवसाईक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होत असुन, या वाहनांना 185 ऐवजी 190 रुपये द्यावे लागणार आहेत.