'कोस्टल रोडचं भूमिपूजन थांबवलं असतं पण...'; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

DCM Devendra Fadnavis Mumbai Coastal Road : मुंबईच्या कोस्टल रोडच्या एका लेनचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

आकाश नेटके | Updated: Mar 11, 2024, 01:09 PM IST
'कोस्टल रोडचं भूमिपूजन थांबवलं असतं पण...'; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका title=

Mumbai Coastal Road : मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका करण्यासाठी सरकारने मुंबईकरांना देशातील पहिला कोस्टल रोड भेट दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयवादावरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आधीचे मुख्यमंत्री या प्रकल्पासाठी दिल्लीला जायचे आणि हात हलवत यायचे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

मुंबईच्या कोस्टल रोडच्या एका लेनचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आलं. या सागरी मार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी कोस्टल रोडचं श्रेय घेण्यावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली. आम्ही कोणाच्याही कामाचे श्रेय घेत नाही. जे काम आम्ही केले आहे, त्याचेच श्रेय आम्ही घेतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

"काल मला इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर पाहायला मिळालं की उबाठाचे जे बाळराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि याचं श्रेय ते घेत आहेत. पहिल्यांदा मी सांगू इच्छितो, की आम्ही दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेणारे नाही आहोत. जे आम्ही करतो, त्याचंच श्रेय घेतो. कोस्टल रोडची संकल्पना नवीन नव्हती. मला आठवतं उद्धव ठाकरेंनी तर मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या कोस्टल रोडचं प्रझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. कोस्टल रोड मात्र कधी झालाच नाही," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"2004 ते 2014 या काळात राज्य आणि केंद्रात यूपीएचं सरकार होतं. कोस्टल रोडची सर्वांत मोठी अडचण ही होती की, आपल्या नियमांत सी लिंक बांधण्यास परवानगी होती. पण कोस्टल रोड बांधण्यास परवानगी नव्हती. कारण कोस्टल रोड तयार करण्यासाठी रेक्लेमशन करावे लागते. रेक्लेमेशन केल्यावर सीआरझेडची लाईन बदलते. म्हणूनच रेक्लेमेशन करू देणार नाही, अशी केंद्राची भूमिका होती," असेही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

"मी याआधी अनेक मुख्यमंत्र्यांना कोस्टल रोडसाठी दिल्लीला जाताना पाहिले. पण दिल्लीहून ते हात हालवत परत यायचे. केंद्राने त्यांना कोस्टल रोडसाठी परवानगी दिलीच नाही. केंद्रात मोदी आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं. आम्ही कोस्टल रोड तयार करण्यासाठी परवानगी मिळवण्यास सुरुवात केली. मला आठवतं त्यासाठी केंद्र सरकारसोबत पाच बैठका झाल्या. प्रत्येक अडचणीवर आम्ही पर्याय काढू लागलो. सीआरझेडची लाईन बदलणार नाही, असं आम्ही केंद्राला सांगितलं," असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

"ज्यावेळी कोस्टल रोडचं भूमिपूजन करायचं होतं, तेव्हा रातोरात भूमिपूजन ठरवलं. मी मुख्यमंत्री होतो, तरी मला भूमिपूजनलाही उद्धव ठाकरेंनी बोलवलं नाही. श्रेयाकरिता आम्ही कधीच लढलो नाही, कारण मी मुख्यमंत्री होतो. मी भूमिपूजन रोखू शकलो असतो, आयुक्तांना ते सांगूही शकलो असतो. पण, आम्हाला मुंबईचा विकास हवाय, आमच्यापेक्षा मुंबई मोठी आहे, आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे. एखादा देवेंद्र फडणवीस राहिल, जाईल. पण, मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण करु शकलोय, त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत. त्यामुळे, कोत्या मनाची लोकं काय असतात, आणि मोठ्या मनाची लोकं काय असतात हे आपल्याला यातून लक्षात येईल," असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला.