'आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही', मुंबईत शिवसदन इमारतीत धक्कादायक प्रकार

No Room For Marathi People: महिलेच्या नवऱ्याला देखील मारहाण केल्याचा आरोप या महिलेने व्हिडिओमध्ये केला आहे. संतप्त झालेल्या या महिलेने एक फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केला आहे.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Sep 27, 2023, 07:21 PM IST
'आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही', मुंबईत शिवसदन इमारतीत धक्कादायक प्रकार  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: मुंबईतील अनेक भागांमध्ये मराठी माणसावर अन्याय झाल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतील मुलुंडमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये एका मराठी महिलेचा संताप अनावर झालेला पाहायला मिळतोय. या महिलेने आणि तिच्या पतीने मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा पहिली होती. मात्र आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही असं या सोसायटीमार्फत या महिलेला सांगण्यात आले. यामुळे आता मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

शिवसदन सोसायटीकडून महिलेला हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर तुम्ही जे सांगत आहात ते लेखी द्या असं या महिलेने सांगितले. पण यानंतर महिलेसोबत सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची भाषा सुरू केली. तसेच हुज्जतही घातली. या महिलेच्या नवऱ्याला देखील मारहाण केल्याचा आरोप महिलेने व्हिडीओमध्ये केला आहे. संतप्त झालेल्या महिलेने फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड करुन आपली शोकांतिका मांडली आहे.

यामध्ये महिला म्हणते की, मुंबई महाराष्ट्रातच मराठी माणसाची ही परिस्थिती आहे, तर आपल्याला छत्रपतींचे मावळे म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मराठीचा कैवार घेतलेल्या सर्वांनी आपल्या पाट्या काढून टाका. फक्त हा राजकीय विषय नाही तर सर्व मराठी माणसांनी हा विषय समजून घेतला पाहिजे कारण हा फक्त माझ्या एकटीचा विषय नाही असा अनुभव कित्येकांना आलेला आहे, अशी व्यथा तिने आपल्या व्हिडीओमध्ये मांडलीआहे.

पाहा व्हिडीओ

अतिशय वाईट अनुभव!

हे आत्ताच थांबलं नाही तर पुढे मराठी माणूस नावालाही मुंबईत शिल्लक राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी घ्यायची आपली लायकी राहिलेली आहे का? अशा शब्दात तिने आपला संताप व्यक्त केला आहे. 

मनसे कार्यकर्त्यांनी विचारला जाब

मुलुंडमध्ये मराठी माणसाला जागा नाकारणाऱ्या सोसायटीतील लोकांना मनसे कार्यकर्त्यांनी जाब विचारला आहे. तक्रारदार महिलेला सोबत घेऊन मुलुंडमधील मनसे कार्यकर्त्यांनी शिवसदन सोसायटीत धाव घेतली. यानंतर मराठी माणसांना घर नाकारणाऱ्या सदस्यांना धारेवर धरलं. मनसे कार्यकर्त्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे शिवसदन सोसायटीच्या सदस्याने माफी मागितली आहे.