जेव्हा नाना पाटेकरांचं बाळासाहेबांशीही वाजलं होतं

 नाना - ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप पूर्वीपासूनच आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत नानांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही वाद असाच वाद झाला होता.

Updated: Nov 5, 2017, 04:07 PM IST
 जेव्हा नाना पाटेकरांचं बाळासाहेबांशीही वाजलं होतं title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूनं मत व्यक्त केलं आणि त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रोषाला तोंड द्यावं लागलं, अगदी नानानं माहित नसताना चोम्बडेपणा करू नये, असं राज ठाकरे यांनी नानांना सुनावलं.

असंच सहा वर्षापूर्वी नानानं वडीलकीच्या भावनेनं, राज-उद्धवनी मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र यावं, असा दिलेला सल्लाही त्यांनाच भारी पडला होता, तेव्हाही राज ठाकरे यांनी नानांना उगाच नको त्या गोष्टीत नाक खुपसू नको, असा दम भरला होता.

नाना - ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप पूर्वीपासून

पण नाना - ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप पूर्वीपासूनच आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत नानांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही वाद असाच वाद झाला होता.

ते झालं असं होतं की, महाराष्ट्र्भूषण पुरस्कराची सुरुवात युतीच्या राजवटीत झाली. सन्मानाचा हा पहिलाच पुरस्कार कुणाला द्यावा, यावर सरकार दरबारी बराच खल झाला होता.

शिवसेना-भाजप युती काळातही बाळासाहेबांशी वाजलं

कुणीतरी बाळासाहेबांचं नाव सुचवलं, पण बाळासाहेबांनी मात्र ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचं नाव सुचवलं, आणि ते सर्वानुमते मान्य झालं, पुलंनीही पुरस्कार स्वीकारण्यास संमती दर्शवली. 

हुकूमशाहीवृत्तीवर पुलंच्या पत्नी सुनीताबाईंचे ताशेरे

प्रत्यक्ष पुरस्कार सोहळ्यात पुलंऐवजी त्यांच्या पत्नी सुनीताबाईंनी भाषण केलं, आणि व्यासपीठावर बाळासाहेब उपस्थित असताना हुकूमशाहीवृत्तीवर सुनीताबाईंनी ताशेरे ओढले, त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्वच चाट पडले होते, बाळासाहेबांची प्रतिक्रिया येणार हे स्वाभाविक होतं, पण ती त्या व्यासपीठावर आली नाही.

उड्डाण पुलांच्या उद्घाटनात पुलंना उत्तर

युती सरकारच्या मुंबईतील महत्वकांक्षी 52 उड्डाणपुलांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सायन येथे पार पडणार होता. बाळासाहेबांसह मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अख्ख मंत्रिमंडळ आणि विविध क्षेत्रातले मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

घसा खराब होता, पण अर्धातास बोलले

भूमीपूजनानंतर प्रमुख वक्त्यांच्या भाषणांचा कार्यक्रम सायन येथील एका मैदानात आयोजित करण्यात आला होता. मनोहर जोशी यांनी आपल्या भाषणात बाळासाहेबांचा घसा ठीक नसल्यामुळं, ते शुभेच्छांचे दोन शब्दच बोलतील असं जाहीर करून टाकलं. पण बाळासाहेबांच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. बाळासाहेब त्यांच्या भाषणात बेधडक बोलले. तेही सुमारे अर्धा ते पाऊण तास.

जुने 'पुलं' मोडून तिथे नवे 'पुलं' बांधावे

पूल बांधकाम भूमीपूजनाचा धागा पकडत बाळासाहेब भाषणात गडकरींच्या विदर्भी भाषेचा दाखल देत म्हणाले की, ते विदर्भात म्हणतात ना, की मोडकळीस आलेले जुने 'पुलं' मोडून तिथे नवे 'पुलं' बांधावे लागतील. भाषणातलं त्यानंतरचं त्यांचं विधान तर खूपच वादग्रस्त ठरलं...

झक मारली आणि महाराष्ट्र् भूषण दिला...

'झक मारली आणि महाराष्ट्र् भूषण दिला', बाळासाहेबांच्या विधानामुळे अवघ्या महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला. साहित्यिक, कलाकारांपासून ते विविध स्तरावर बाळासाहेबांच्या या विधानाबाबत नाराजीच्या, निषेधाच्या प्रतिक्रिया उमटल्या. अगदी वृत्तपत्रांमध्येही बातमीत 'झक मारली' हे शब्द वापरावेत का याबाबत बराच खल झाला.

नाना पाटेकर यांनीही या वादात उडी घेतली

एकीकडे हे सगळं घडत असताना त्यावेळी खूप फार्मात आणि लोकप्रियतेचं प्रचंड वलय असलेल्या नाना पाटेकर यांनीही या वादात उडी घेतली... त्यांनी बाळासाहेबांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. 

नाना पाटेकरांचं बोलणं शिवसैनिकांना प्रचंड झोंबलं

पु.ल. देशपांडे आणि बाळासाहेब ही दोन्ही व्यक्तिमत्व तितक्याच ताकदीची आणि सर्वांना प्रिय असल्याचं ते म्हणाले. पण बाळासाहेब तुम्ही खूप पुढे गेला आहात आणि यापुढेही जात राहाल, पण मागे वळून पाहाल, तर सोबत कुणी नसेल नाना पाटेकर यांचं हे विधान शिवसैनिकांना प्रचंड झोम्बलं होतं.

यासाठी नानांनी थेट मातोश्री गाठलं 

त्यावर नानाविरोधी प्रतिक्रियाही उमटू लागल्या, त्यानंतर वाद आणखी चिघळू नये यासाठी नानांनी थेट मातोश्री गाठलं होतं.. या घटनेचे शिवसेनेतले काही प्रत्यक्षदर्शी असं सांगतात की, बाळासाहेबांनी नाना यांना बराच वेळ आपल्या खोलीबाहेर ताटकळत उभं ठेवलं होतं. मग नाना-ठाकरेंमधला वाद कसाबसा मिटला होता.

बाळासाहेब-नाना पाटेकर यांच्यातही स्नेहपूर्ण संबंध

तर नंतर स्वतः बाळासाहेबांनी पुण्यात पुलंच्या घरी जाऊन महाराष्ट्र्भूषण पुरस्काराच्या वादावरही पडदा टाकला. पुढच्या काळात झालं गेलं विसरून बाळासाहेब आणि नाना पाटेकर यांच्यातही स्नेहपूर्ण संबंध तसेच कायम राहिले.

आता या सगळ्यात मुद्दा इतकाच आहे की, नानांचा यावेळीही ठाकरेंशीच वाद झालाय, पण तो राज ठाकरेंशी आहे, आणि निर्माण झालेला वाद आणखी चिघळू नये या समेटासाठी ते 'कृष्णकुंज'वर जाणार का ?