नेटवर्क येत नाही म्हणून IAS अधिकाऱ्याची तरुणांना वळ उठेपर्यंत मारहाण; आठवड्यानंतरही कारवाई नाही

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत आयएएस अधिकाऱ्याने दोन एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणांना पाईपने मारहाण केल्याने त्यांच्या अंगावर वळ उठले आहेत. आठवडाभरानंतरही कारवाई न झाल्याने तरुणांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 7, 2024, 01:23 PM IST
नेटवर्क येत नाही म्हणून IAS अधिकाऱ्याची तरुणांना वळ उठेपर्यंत मारहाण; आठवड्यानंतरही कारवाई नाही title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली येथे एअरटेलचच्या कर्मचाऱ्यांना आयएएस अधिकाऱ्याने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आयएएस अमन मित्तल यांनी मारहाण केल्याचा आरोप एअरटेलच्या दोन कर्मचाऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी अमन मित्तल आणि मारहाण झालेले कर्मचारी यांनी दोघांविरोधात तक्रार दिली आहे. मारहाण झालेल्या तरुणांनी पत्रकार परिषद घेत आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यामुळे याप्रकरणाची आता सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

आयएएस अमन मित्तल हे मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत आहेत. मित्तल हे त्यांचा भाऊ देवेश मित्तल यांच्या घरी असताना त्यांनी एअरटेलचे वायफाय कनेक्शन लावले होते. मात्र ते सुरु होत नसल्याने त्यांनी याची तक्रार केली. तक्रारीनंतर पुन्हा दोन कर्मचारी वायफायचे कनेक्शन तपासण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. या हाणामारीत एअरटेल कर्मचाऱ्यांच्या हात, पाय आणि पाठीवर मारहाणीचे वळ उठले आहेत. सागर मांढरे आणि भूषण असे मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत.

दोघांनाही अमन मित्तल आणि त्यांच्या भावाने पाईने जबर मारहाण केल्याचा आरोप सागर मांढरे आणि भूषण गुजर यांनी आपल्या वकिलासह पत्रकार परिषद घेऊन केला आहे. आमच्या मोबाईल मधून जबरदस्तीने त्यांचा यूपीआय आयडी टाकून आयएएस अधिकारी अमन मित्तल यांनी आमच्या बँक खात्यातून पैसे स्वतःच्या बँकेत वळते केल्याचाही गंभीर आरोप या तरुणांनी केला आहे. त्यामुळे आयएएस अधिकारी अमन मित्तल यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे, आयएएस अमन मित्तल यांनी देखील एअरटेलचे कर्मचारी सागर मांढरे आणि भूषण गुजर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रबाळे पोलिसांनी दोन्हीही तक्रारींची दखल घेत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगितले.

नेमकं काय घडलं?

दरम्यान या सगळ्या प्रकाराबाबत सागर मांढरे याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. "नमस्कार, मी सागर मांढरे नवी मुंबई कोपरखैरणे मध्ये राहतो. सध्या मी एअरटेलमध्ये इंजिनिअर आहे. 30 डिसेंबर रोजी मी वायफाय राऊटर इन्स्टॉलेशनसाठी घणसोलीमध्ये व्यंकटेशश्वर बिल्डिंगमध्ये गेलो होतो. त्याच ठिकाणी एका कस्टमरची इंटरनेटबद्दल मला तक्रार आली ती पाहण्यासाठी गेलो होतो. तो ग्राहक आयएएस अधिकारी होता. त्याचा सोबत त्याचा घरामध्ये त्याचा भाऊ देखील होता, मी तपासणी केली असता इंटरनेट सुरळीत चालू असल्याची खात्री झाली. परंतु आयएएस अधिकाऱ्याला बेडरूम मध्ये रेंज मिळत नसल्याचे त्याने मला सांगितले. मी त्याची देखील पाहणी केली. त्याला बेडरूममध्ये त्याला रेंज नव्हती मिळत. त्यावर मी त्याला सांगितले तुमचे 4 बीएचके घर आहे आणि हॉलमध्ये राऊटर लावल्याने त्याची रेंज बेडरूम पर्यंत मिळण शक्य नाही. त्यावर तो भडकला आणि "मी एवढे पैसे भरले आहेत मला बेडरूम मध्ये रेंज आलीच पाहिजे" असं तो बोलू लागला. त्यावर मी त्याला वायफाय सोल्युशनबद्दल सांगितले. परंतु त्यावर तो अजून भडकला आणि मला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही ऐकलं नाही आणि माझा अंगावर धावून येऊ लागला. मी त्याला अडवण्यासाठी माझे हात पुढे केले, त्यावर त्या आयएएस अधिकारी (अमन मित्तल) आणि त्याचा भाऊ (देवेश, मित्तल) यांनी घरात दरवाजा बंद करून मला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि खाली तैनात असणाऱ्या शिपाई कामगारांना त्याने कॉल करून बोलावून घेतले. ते चारजण लोखंडी पाईप, पीव्हीसी पाईप आणि लाकडी दंडुके घेऊन वर आले काहीही विचार न करता त्यांनी देखील मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या नंतर त्यानेच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. मला पोलीस तेथून घेऊन जात असताना त्यातील एकाने पुन्हा दोन वेळा माझा कानशिलात लगावली आणि  रबाळे पोलीस स्टेशनला घेऊन त्या अमन मित्तलच्याच गाडीतून घेऊन गेले. माझा अंगावरील घाव बघितल्यावर पोलीस मला घेऊन ऐरोली येथे एनएमएमसी हॉस्पिटल मध्ये गेले. नंतर पोलीस स्टेशनला आल्यावर प्रथम माझ्यावर एफआयआर दाखल केली. माझी तक्रार पोलीस घेत नव्हते. माझे अनेक सहकारी आणि मित्र रबाळे पोलीस चौकी बाहेर उभे होते अनेक जणांना संपर्क केल्यावर सकाळी तीन वाजता त्यांनी माझी तक्रार नोंदवली. पोलिसांवर सुध्दा त्याने वरून दबाव आणल्याचे मला जाणवले. आज या घटनेला आठवडा झाला तरी देखील गुन्हेगारांवर अजून कोणतीही कारवाई झाली नाही," असे सागर मांढरेने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.