अयोध्येत जाणाऱ्या ट्रेनवर पुण्यात हल्ला; जळता मोबाईल फेकल्याने महिला जखमी

Ayodhya Special Aastha Train : पुण्याहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये अज्ञात इसमाने जळता मोबाईल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेन पनवेल स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.  

आकाश नेटके | Updated: Feb 8, 2024, 09:10 AM IST
अयोध्येत जाणाऱ्या ट्रेनवर पुण्यात हल्ला; जळता मोबाईल फेकल्याने महिला जखमी title=

Navi Mumbai Crime : राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भगवान रामाच्या भक्तांची अयोध्येकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने विविध शहरांना अयोध्येच्या पवित्र स्थळाशी जोडण्यासाठी आस्था विशेष गाड्यांची मालिका सुरू केली आहे. 30 जानेवारीपासून, रेल्वे प्रशासनाने पुणे ते अयोध्येसाठी दर दोन दिवसांनी 15 विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये आस्था स्पेशल ट्रेनचाही समावेश आहे. मात्र मंगळवारी अयोध्येकडे जाणाऱ्या या ट्रेनमध्ये एक भयानक घटना घडली.

श्रीरामलल्लांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये 6 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसमाने जळता मोबाईल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञाताने जळता मोबाईल ट्रेनच्या खिडकीतून आत फेकल्याने एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. या घटनेने रेल्वे बोगीतल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. ही घटना मंगळवारी चिंचवड ते देहू रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान घटली. आस्था स्पेशन ट्रेन पनवेल स्थानकात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी बोगीत धाव घेत जळत्या मोबाईलसह इतर सामान जप्त केले.

ट्रेनच्या खिडकीतून अज्ञात व्यक्तीने जळणारा मोबाईल फोन फेकल्याने एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अयोध्येतील प्रभू राम लल्ला मंदिराच्या दर्शनासाठी पुण्याहून अयोध्येसाठी विशेष ट्रेन चालवण्यात आली होती. चिंचवड स्थानकातून सायंकाळी 7.25 वाजता गाडी सुटत असताना चिंचवड ते देहू रोड दरम्यान 7:52 ते 7:59 च्या दरम्यान कोणीतरी तिच्या खिडकीतून जळणारी वस्तू फेकली.

पोलीस तपासात ही वस्तू मोबाईल फोन असल्याचे समोर आलं. पुण्यातील धनकवडी येथील छाया हरिभाऊ काशीद या प्रवाशाच्या पाठीवर मोबाईल फोन आदळल्याने त्या जखमी झाल्या. रात्री 10.22 वाजता ही गाडी पनवेल स्थानकावर आल्यावर रेल्वे पोलिसांनी तात्काळ बचाव मोहीम राबवून मोबाईल फोन आणि इतर संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. गाडी पनवेल स्थानकात येताच पनवेल रेल्वे पोलीस आणि पनवेल शहर पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली होती. रेल्वे पोलीस दलातील हेडकॉन्स्टेबल संदीप नंदकुमार माने यांनी जखमी महिला प्रवाशी व इतरांचे जबाब घेत हे प्रकरण पुणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले.