१० रुपयांच्या शिवथाळीसोबत १५ रुपयांची पाण्याची बाटली, आव्हाड ट्रोल

 १५ रुपयांची पाण्याची बाटलीही गरिबांना मोफत मिळणार का ? असा सोशल मीडियात सवाल 

Updated: Jan 26, 2020, 11:16 PM IST
१० रुपयांच्या शिवथाळीसोबत १५ रुपयांची पाण्याची बाटली, आव्हाड ट्रोल  title=

ठाणे : आज प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने ठाकरे सरकारच्या १० रुपयांत शिवथाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या पहिल्याच दिवशी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड टीकेचे धनी झाले. शिवथाळी योजनेचा शुभारंभ केल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः या थाळीचा आस्वाद घेतला. मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत १५ रुपयांची पाण्याची बाटलीही होती. त्यामुळे १० रुपयांच्या शिवथाळीसोबत १५ रुपयांची पाण्याची बाटलीही गरिबांना मोफत मिळणार का ? असा सवाल विचारत, नेटिझन्सनी जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केलं.

ठाण्यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत, तसंच कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. आई वडिलांनी जन्म दिला पण ओळख शरद पवारांमुळे मिळाली अशी कबुली जितेंद्र आव्हाड यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. 

तर आपल्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोन विठ्ठल असल्याचं यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले. राज्यातल्याप्रमाणेच दिल्लीतही परिवर्तन होणार आणि त्याचे सूत्रधार हे सुद्धा शरद पवारच असतील असा दावा, राऊतांनी केला. तर आपल्या आयुष्याची सुरुवातही शुन्यातूनच झाल्याची आठवण शरद पवारांनी आपल्या भाषणात सांगितली.