राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने पाडुरंग फुंडकर यांचं आज सकाळी निधन झालं. 

Updated: May 31, 2018, 08:28 AM IST
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन title=

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचं, ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, मुंबईतील सोमय्या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पांडुरंग फुंडकर हे ६७ वर्षांचे होते. पांडुरंग फुंडकर यांनी यापूर्वी भाजपाचं प्रदेशाध्यक्ष देखील भूषवलं होतं, विरोधीपक्ष नेतेपदाचं काम देखील त्यांनी पाहिलं होतं. पांडुरंग फुंडकर यांना भाऊसाहेब देखील म्हटलं जायचं. पांडुरंग फुंडकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते, शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख होती असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसची प्रचंड लाट असतानाही पुढील निवडणुकीतही अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला होता.

पांडुरंग तथा भाऊसाहेब पुंडलिक फुंडकर हे भाजपाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. पांडुरंग फुंडकर हे भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते. एकनाथ खडसे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळात त्यांना कृषीमंत्रीपद देण्यात आलं होतं. पांडुरंग फुंडकर यांच्या राजकीय कारकिर्दीला जनसंघापासून प्रारंभ झाला. आणीबाणीविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यामुळे त्यामुळे तुरुंगात जावे लागले. पुढे त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. त्यांनी कापसाच्या दरासाठी खामगाव ते आमगाव अशी पदयात्रा काढली होती.

अकोला लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडले गेले. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसची प्रचंड लाट असतानाही पुढील निवडणुकीतही अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला होता. यानंतर युती सरकारच्या काळात कापूस पणन महासंघाच्या मुख्य प्रशासकपदी नेमणूक झाली. त्याच काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते सतत ३ वर्षे कार्यरत होते. त्यांनंतर त्यांची विधान परिषदेवर नियुक्‍ती झाली आणि विरोधी पक्षनेते पद मिळाले. उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देखील फुंडकर यांना मिळाला आहे.