खड्यांवरुन ट्विटरवर रंगला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामना

राज्यभरातील रस्त्यांवर असलेल्या खड्यांवरुन चांगलचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे.

Updated: Nov 4, 2017, 08:41 PM IST
खड्यांवरुन ट्विटरवर रंगला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामना title=
Image: Twitter

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यभरातील रस्त्यांवर असलेल्या खड्यांवरुन चांगलचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे.

खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर सेल्फी विथ पॉटहोल्स ही मोहीम सुरू केली. यानंतर त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरच उत्तर दिलं आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या मोहीमेला उत्तर देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पॉटहोल मुक्त महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरून ट्विटरवर उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगात सुरू असल्याचे म्हटले आहे. याचा पुरावा म्हणून त्यांनी खड्डे बुजवण्याच्या कामाचे चार फोटोही शेअर केले आहेत.

तासगाव, बहादुरी, येवला, नांदगाव, पिलखोड, बहल या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे हे फोटो आहेत. सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यासोबत सेल्फी काढून ट्विटरवर सरकारविरोधात जोरदार मोहीम सुरू केली होती, त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर नेत्यांनीही खड्ड्यासोबत सेल्फी काढून ते ट्विटरवर शेअर केले होते.

आता सरकारकडून विरोधकांच्या या मोहीमेला ट्विटरवरूनच उत्तर देण्यासाठी स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सरसावले आहेत. त्यामुळे खड्ड्यांवरून सुरू असलेले राजकारण आता सोशल मिडियावर गाजणार आहे.