लोकसभा निवडणूक होऊ द्या मग...; राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शिंदे-फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

सुरभि जगदीश | Updated: Apr 10, 2024, 06:55 AM IST
लोकसभा निवडणूक होऊ द्या मग...; राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शिंदे-फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया! title=

Raj Thackeray: शिवाजी पार्कावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भव्य गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची भूमिका अखेर जाहीर केली. यावेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हिंदुत्वासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी ही भूमिका बरोबर असून त्यांचा एक पक्ष आहे आणि प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे." आता लोकसभा निवडणूक होऊ द्या. लोकसभा निवडणूक झाल्यावर आपण विधानसभेचं पाहू, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

मी राज ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत देश वेगाने पुढे जातोय. त्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला आहे. मोदींनी आपला देश पुढे नेला आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार

सस्नेह स्वागत! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या! अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या राजकीय रस्सीखेचावर देखील भाष्य केलंय. यावेळी राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होणार का? या चर्चित असलेल्या विषयावर देखील आपली भूमिका व्यक्त केली. मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असेल तर तेव्हाच झालो असतो. मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं, मी पक्ष फोडणार नाही, मी स्वत:चा पक्ष काढेल. मी आजही सांगतोय, मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.