ईस्टर्न एक्स्प्रेसवे, अटल सेतूवरुन ठाण्यात पोहोचा, रमाबाई आंबेडकर नगरच्या रिडेव्हलपमेंटला गती

Mumbai News Today: मुंबईत मोठ्या प्रमाणात पुर्नविकास प्रकल्पांची सुरुवात होत आहे. आता घाटकोपरमध्येही एक मोठा प्रकल्प तयार होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 28, 2024, 06:07 PM IST
ईस्टर्न एक्स्प्रेसवे, अटल सेतूवरुन ठाण्यात पोहोचा, रमाबाई आंबेडकर नगरच्या रिडेव्हलपमेंटला गती title=
ramabai ambedkar nagar redevelopment plan to connect eastern expressway and atal setu to thane

Mumbai News Today:  झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्वसनचे (Ramabai Ambedkar Nagar Redevelopment) काम लवकरच सुरू करण्याची तयारी केली आहे. सध्या युद्धपातळीवर स्थानिक नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहेत. एसआरएने एप्रिलपर्यंत सर्वेक्षण आणि बायोमेट्रिक डेटा एकत्र करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत जमीन खाली करुन पुर्नविकासासाठी प्राधिकरणाला सोपवण्यात येणार आहे. एसआरएने पूर्व एक्स्प्रेस वेच्या मार्गात येणाऱ्या  झोपड्यांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 

एसआरएचे सक्षम प्राधिकारी आणि उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रीवेला ठाणेपर्यंत जाणाऱ्या मार्गात रमाबाई आंबेडकर नगरमधील एकूण 1694 घरे मध्ये येत होती. या सर्व घरांचा बायोमेट्रिक डेटा एकत्रित करुन आणि सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आली आहे. पात्र परिवारांची यादी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)ला देण्यात आली आहे. एमएमआरडीए आगामी काही दिवसांत पात्र परिवारांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू करु शकते. उर्वरित घरांचे सर्वक्षण एप्रिलपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. 

ईस्टर्न एक्सप्रेस वे आणि अटल सेतूवरुन जाणाऱ्या वाहनांना कमी कालावधीत पोहोचता यावे यासाठी ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तर, एसआरएने फ्रीवेचा विस्तारात अडचण ठरणाऱ्या 1694 झोपड्यांचा सर्वेक्षण पूर्ण करत एसआरएने मोठं काम पूर्ण केले आहे. अशातच स्थानिक नागरिकांबरोबर अॅग्रीमेंट आणि घराचे भाडे देऊन जमीन खाली करण्यात येणार आहे. त्याचबरोबर फ्रीवेच्या विस्ताराचे कामही एमएमआरडीए सुरू करु शकतात. 

6 पथकाकडून सर्वेक्षण

मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी सरकारने पहिल्यांदा एसआरए आणि एमएमआरडीएला एकत्र घेऊन या प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. त्याअंतर्गंत घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये सर्वेक्षण करण्याचे आणि जमीन खाली करण्याची जबाबदारी एसआरएला देण्यात आली आहे. तर, रमाबाई नगरमध्ये बिल्डिंग उभारण्याचे काम एमएमआरडीएकडे सोपवण्यात आले आहे.  सरकारने या प्रकल्पाच्या माध्यमातून रमाबाई नगरजवळ 15 हजार घरांच्या रिडेव्हलपमेंटचा प्लान तयार केला आहे. सर्वेचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी 6 पथके तैनात केले आहेत. एका टीममध्ये 5 सदस्य आहेत. जे सर्वेक्षणाबरोबरच बायोमेट्रिक डेटा एकत्रिक करत आहेत. 

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईत घरांची संख्याही वाढणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पात्र नागरिकांना मोफत घरे उपलब्ध करुन देणार आहेत. त्याचबरोबर 5 हजार अतिरिक्त घरांचे निर्माण केले जाणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबईत घरे निर्माण होणार आहेत. अतिरिक्त घरांची बाजारात विक्री केली जाणार आहे.

या प्रोजक्टमधून तयार होणाऱ्या घरांची विक्री म्हाडा आणि सिडकोप्रमाणे होणार आहे. एमएमआरडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त घरांची विक्री ही सरकारी संस्थांप्रमाणेच होणार आहे. यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाहीये. मात्र घरांची विक्री लॉटरी पद्धतीनेच होणार आहे.