पीएम मोदींच्या हस्ते 90 रुपयांचे नाणे लॉन्च, पाहा कसं असणार

RBI 90th Anniversary : रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे विशेष नाणे जारी केलंय. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते 40 ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे. त्याचबरोबर या नाण्याची अंदाजे किंमत 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता आहे.

राजीव कासले | Updated: Apr 1, 2024, 01:45 PM IST
पीएम मोदींच्या हस्ते 90 रुपयांचे नाणे लॉन्च, पाहा कसं असणार title=

RBI 90th Anniversary : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. RBIच्या स्थापनादिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उपस्थित होते. सकाळीच मुंबईत पंतप्रधान मोदींचं आगमन झालं. रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank of India) 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे विशेष नाणे जारी केलं. देशात प्रथमच 90 रुपयांचे नाणे (90 Rs Coin) जारी करण्यात आले आहे. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. याशिवाय यामध्ये 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. 90 रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला आरबीआयचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 90 रुपये असं लिहिलेलं आहे.

90 रुपयांच्या नाण्याचं वैशिष्ट्य
90 रुपयांच्या नाण्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेलं आहे. नाण्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो असेल आणि वरच्या बाजूला हिंदीमध्ये आणि खाली इंग्रजीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे. लोगोच्या खाली RBI @90 असे लिहिलेलं आहे. भारत सरकारच्या टांकसाळीत बनवलेल्या या 90 रुपयांच्या नाण्याचे वजन 40 ग्रॅम आहे. विशेष म्हमजे हे नाणं 99.9 टक्के शुद्ध चांदीपासून बनलेलं आहे. याआधीही 1985 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण जयंती आणि 2010 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम ज्युबिलीवर स्मारक नाणी जारी करण्यात आली होती.

किती रुपयांना मिळणार नाणं?
मिळालेल्या माहितीनुसार या नाण्याची अंदाजे किंमत 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसह नाणे संग्राहकांमध्ये या नाण्याबाबत प्रचंड उत्साह आहे. 19 मार्च 2024 रोजी, आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना देखील जारी केली होती.

पीएम मोदींकडून कौतुक
आरबीआयच्या 90 वर्षांच्या योगदानाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौकुत केलं आहे. देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआयची भूमिका महत्त्वाची आणि मोठी आहे. आरबीआच्या कामाचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक समावेशनाचे फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे अशा शब्दात पीएम मोदींनी कौतुक केलं आहे. 

दरम्यान यावेळी बोलताना पी एम मोदी यांनी मी हे 100 दिवस निवडणुकीमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे तुमच्याकडे नवीन धोरणांचा विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे, कारण शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला खूप काम करावं लागेल असंही पीए मोदींनी सांगितलं.