सेनेची 'समृद्धी' खुंटली... धरसोड वृत्तीवर शिक्कामोर्तब

समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध करण्याची भाषा बोलून दाखवणाऱ्या शिवसेनेची भूमिका आता बदलली आहे का? असा प्रश्न सध्याच्या शिवसेनेच्या एकंदर चित्रावरुन निर्माण होत आहे. नाशिकसह शहापूर तालूक्यातूनही समृद्धी महामार्गला जमीन देण्यास विरोध होत आहे. त्याच शहापूरमध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुरु होणार आहे.

Updated: Jul 14, 2017, 05:30 PM IST
सेनेची 'समृद्धी' खुंटली... धरसोड वृत्तीवर शिक्कामोर्तब title=

मुंबई : समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध करण्याची भाषा बोलून दाखवणाऱ्या शिवसेनेची भूमिका आता बदलली आहे का? असा प्रश्न सध्याच्या शिवसेनेच्या एकंदर चित्रावरुन निर्माण होत आहे. नाशिकसह शहापूर तालूक्यातूनही समृद्धी महामार्गला जमीन देण्यास विरोध होत आहे. त्याच शहापूरमध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुरु होणार आहे.

शनिवारी शहापूर रजिस्टर कार्यालयात ४ वाजता हा जमीन अधिग्रहण कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी नागपुरमधून समृद्धीसाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात केली गेली. नागपूरमधून शेतकऱ्यांचा तितकासा विरोध नव्हता. मात्र शहापूरमध्ये समृद्धीविरोधत शेतकरी कमालीचे आक्रमक आहेत.

सेनेतला गोंधळ उघड

परंतु, वारंवार बदलत्या भूमिकांमुळे शिवसेनेची आता चेष्टा होऊ लागलीय. समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेमुळे त्यांच्या या धरसोड वृत्तीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तबच झालंय. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठामपणे उभे राहिले होते. पण त्यांच्याच पक्षाचे राज्यातले कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतीनं शिवसेनेत समृद्धी महामार्गाच्या भूमिकेवरून असलेला गोंधळ उघड झालाय. एकनाथ शिंदे १३ जुलैला नागपूरमध्ये समृद्धी महामार्ग भूमी अधिग्रहण कार्यक्रमासाठी फक्त उपस्थितच राहिले नाहीत, तर त्यांच्या साक्षीनं जमीन खरेदीखतावर ठसाही उमटवला गेला.

'समृद्धी'चा महामार्ग...

समृद्धी महामार्गाची लांबी ७०० किलोमीटर असून या प्रकल्पासाठी अंदाजे ४६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. १० जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्ग उभारणीचा खर्च २४ हजार कोटी असून, भूमी अधिग्रहणासाठी सुमारे १३ हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. दरम्यान, या प्रकल्पाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध मावळावा यासाठी, सरकार या जमिनीचा मोबदला म्हणून चढे दर देत आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कुरघोडीचं राजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतला समृद्धी महामार्ग हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण होणं स्वाभाविकच आहे. मात्र शिवसेनेच्या प्रसंगानुरूप सतत बदलणाऱ्या भूमिका आता सवयीचाच भाग झाल्या आहेत. पण शिवसेनेच्या या सवयीची कल्पना नसलेले आणि समृद्धी महामार्गाला विरोध करणारे शेतकरी मात्र यामुळे चक्रावून गेले असतील हे नक्की.