एसटी सुरु झाली, पण दरदिवशी होतोय २२ कोटींचा तोटा

यापूर्वीच एसटी महामंडळ जवळपास सहा हजार कोटींच्या तोट्यात आहे. 

Updated: Aug 28, 2020, 03:35 PM IST
एसटी सुरु झाली, पण दरदिवशी होतोय २२ कोटींचा तोटा title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: राज्यात एसटी सेवा सुरू झाल्यावर सर्वसामान्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी एसटी महामंडळ दिवसेंदिवस खड्ड्यात जात आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहून नेण्याचे बंधन असल्याने एसटीला दररोज सुमारे २२ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. 

यापूर्वीच एसटी महामंडळ जवळपास सहा हजार कोटींच्या तोट्यात आहे. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध आल्याने आता एका सीटवर एकच प्रवाशी बसवणे बंधनकारक आहे. त्यामुळे डिझेलचा खर्चही भरून निघत नाही. परिणामी पाच महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत सुरू झालेली एसटी सेवा मरणासन्न अवस्थेकडे जात आहे. 

एरवी प्रवासी वाहतुकीद्वारे एसटीला दररोज एक लाख फेऱ्यांच्या माध्यमातून २४ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळायचे. दररोज ६५ लाख प्रवासी प्रवास करायचे. २७ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार सुमारे १५ हजार एसटीच्या फेऱ्याद्वारे ३ लाख ४१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यामधून जेमतेम सुमारे दीड कोटी उत्पन्न एसटीला मिळाले. त्यातच कोविडच्या प्रादुर्भावामुळे एसटी सेवा पूर्ण क्षमतेने ऐवजी अत्यंत मर्यादित स्वरूपात सुरू आहे. आर्थिक परिस्थिती खराब असल्याने स्वतःच्या सुमारे एक लाखापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळ पगार देऊ शकलेले नाही. यामुळे आता कर्मचाऱ्यांचा उद्रेग होण्याची भीती व्यक्त होत आहे.