पालकांनो आपल्या चिमुकल्यांकडे लक्ष द्या, त्यांना एकटे सोडणं जीवावर बेतू शकतं

या चिमुकल्यांसोबत जे घडलं ते तुमच्या मुलांसोबत घडू नये... त्यासाठीच आपल्या मुलांना कधीच एकटं सोडू नका पाहा व्हिडीओ

Updated: Jan 2, 2022, 09:17 PM IST
पालकांनो आपल्या चिमुकल्यांकडे लक्ष द्या, त्यांना एकटे सोडणं जीवावर बेतू शकतं title=

मुंबई : आपल्या मुलांना एकटं सोडणं धोक्याचं होत चाललं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पालकांनो आपल्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या हे सांगणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या काळजाचा थरकाप उडू शकतो.

कल्याणच्या द्वारली गावात एका 4 वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. सुहास निंबोरे असं या मुलाचं नाव आहे. तीन भटक्या कुत्र्यांनी या चिमुकल्याला 18 ठिकाणी चावा घेतला.

नागरिकांनी या मुलाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवलं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे कल्याण डोंबिवली मध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दुसरीकडे भोपाळमध्ये जे घडलंय ते अत्यंत धक्कादायक आहे. एक पाच वर्षांची मुलगी रसत्यावर खेळत होती.  तेवढ्यात तिथे काही कुत्र्यांची टोळी आली. सगळे कुत्रे तिच्या मागे धावत आले आणि त्या चिमुकलीला घेरलं. कुत्र्यांनी तिला खाली पाडलं. पाच कुत्रे त्या मुलीवर अक्षरशः तुटून पडले. या कुत्र्यांनी चिमुकलीवर हल्ला केला. 

कुत्र्यांनी मुलीवर जोरदार हल्ला चढवला आणि तिचे अनेक ठिकाणी चावे घेतले. कुत्र्यांचा मुलीवर हा क्रूर हल्ला सुरू असतानाच सुदैवानं तिथे एक माणूस आला. त्यानं हे भयानक दृश्य पाहिलं आणि दगड मारुन कुत्र्यांना पिटाळलं. पण तोपर्यंत कुत्र्यांनी चिमुकलीला अक्षरशः रक्तबंबाळ केलं होतं. 

या चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. या घटनेचं हे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. भोपाळमधल्या बागसेवानियामधला हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे भोपाळमधील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे.