मुंबई : मुंबई लोकलच्या तीन्ही रेल्वे मार्गांवर आज 'मेगा ब्लॉक' असणार आहे. रविवारी घेण्यात आलेल्या या 'मेगा ब्लॉक' मुळे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. मेगा ब्लॉक दरम्यान कल्याण ते अंबरनाथ अप - डाऊन मार्गावर, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान दोन्ही मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव पाचवा मार्गावर ब्लॉक असेल. त्यामुळे गाड्यांच्या अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्य मार्गावर होणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे मुंबई ते पुणे दरम्यानच्या सिंहगड, प्रगती आणि पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे.
मुंबई - पुणे - मुंबई सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस, पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे. काकीनाडा पोर्ट-एलटीटी-काकीनाडा एक्स्प्रेस, सीएसएमटी ते नागरकोईल एक्स्प्रेस, हैदराबाद - सीएसएमटी - हैदराबाद एक्स्प्रेस, चेन्नई सेन्ट्रल-सीएसएमटी-चेन्नई सेन्ट्रल एक्स्प्रेस, कोल्हापूर-सीएसएमटी सह्य़ाद्री एक्स्प्रेस, कोईंबतूर ते एलटीटी एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जतमार्गे चालवण्यात येतील. महत्वाचे म्हणजे, कल्याण ते सीएसएमटी मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
कल्याण ते अंबरनाथ अप-डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ४ च्या सुमारास मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर बदलापूर ते कर्जतदरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान अप-डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ३.४०च्या सुमारास अप मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर सकाळी ११.४० ते ४.१०च्या सुमारास डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव पाचवा मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०. ३५ ते दुपारी ३.५३च्या सुमारास मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.