अरेरे! पैसे नसल्याने अभिनेत्यावर कार विकण्याची वेळ

आयुष्यात माझ्यावर अशी वेळ कधीच आली नव्हती  

Updated: May 29, 2020, 07:37 AM IST
अरेरे! पैसे नसल्याने अभिनेत्यावर कार विकण्याची वेळ title=

मुंबई: लॉकडाऊनमुळे सध्या चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये आता हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा असलेल्या मानस शहाची भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे मानसवर स्वत:ची कार विकण्याची आणि भाड्याचे घर सोडण्याची वेळ ओढावली आहे. 

मानसने यापूर्वी "Hamari Bahu Silk" या मालिकेत काम केले होते. मात्र, मालिकेच्या निर्मात्यांनी अजूनही त्याचे मानधन न दिल्यामुळे मानसकडे पैसेच उरलेले नाहीत. त्यामुळे मानस शहाने कार विकण्याचा निर्णय घेतला. त्याने म्हटले की, आयुष्यात पहिल्यांदाच मी अशाप्रकारच्या परिस्थितीचा सामना करत आहे. मला सध्या खूप मोठ्या आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागतेय. त्यामुळेच उदरनिर्वाहासाठी माझ्यावर कार विकण्याची वेळ आली. तसेच मी भाड्याने राहत असलेले घरही सोडले आहे. सध्या मी माझ्या चुलत भावाच्या घरी राहत असल्याचे मानसने सांगितले.

मानसने "Hamari Bahu Silk" या मालिकेत २ मे २०१९ रोजी काम करायला सुरुवात केली होती. ५ नोव्हेंबरपर्यंत त्याने या मालिकेत काम केले. मात्र, आम्हाला केवळ मे महिन्यातील कामाचेच पैसे मिळाल्याचे मानस शहाने सांगितले. हे पैसेही सप्टेंबर २०१९ मध्ये मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यासाठी आम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर मालिकेतील एकाही कलाकाराला निर्मात्यांकडून दमडीही मिळालेली नाही, असे मानसने सांगितले.
 
यापूर्वी मानसने 'हमारी देवरानी' आणि 'संकटमोचक महाबली हनुमान' या मालिकांमध्ये काम केले होते. मात्र, माझ्यावर आजपर्यंत अशी परिस्थिती कधीच आली नव्हती, असे त्याने सांगितले. माझे आई-वडील अहमदाबादला राहतात. वडील बँकेतून नुकतेच निवृत्त झाले आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या मालिकांचे चित्रीकरण ठप्प आहे. त्यामुळे केवळ माझ्यावरच नव्हे तर अनेक कलाकारांवर वाईट वेळ ओढावली आहे. आतापर्यंत निर्माते आमचे पैसे बराच काळ थकवायचे मात्र, लॉकडाऊनमुळे आमच्याकडे कामच उरलेले नाही. तसेच भविष्यात काम मिळेल, याचीही शाश्वती नसल्याबद्दल मानसने चिंता व्यक्त केली.