'तोतया मुख्यमंत्र्यांना स्मारकात स्थान नाही' उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण, शिंदे सोडून संग्रहालयात सेनेच्या सर्व मुख्यमंत्र्याचे फोटो   

Updated: Nov 5, 2022, 06:31 PM IST
'तोतया मुख्यमंत्र्यांना स्मारकात स्थान नाही'  उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो असतील,पण सेनेच्या नावाने तोतयागिरी करणाऱ्यांना स्मारकात स्थान नाही असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. यात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक कसं असेल याचं सादरीकरण झालं. 

बाळासाहेबांचं स्मारक हे स्फूर्तीस्थान असणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या स्मारकाचं 58 टक्के काम पूर्ण झालंय. त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या परवानग्या घेण्यात आल्यायत. या स्मारकामध्ये बाळासाहेबांचे फोटो, भाषण, व्यंगचित्रंही पाहायला मिळणार आहेत. कुणाकडे बाळासाहेबांचे फोटो असतील तर ते द्यावेत, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

येत्या सतरा नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांचा हा पुतळा नसेल तर ते प्रेरणास्थान असेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ही हेरिटज वास्तू आहे, त्या वास्तूला धक्का न पोहोचवता काम सुरु आहे. बाजूला समुद्र आहे जमिनीखाली देखील बांधकाम करावं लागतंय अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

बाळासाहेबांची काही भाषणं आपल्याकडे उपलब्ध नाहीत, ती मिळवण्याचा प्रयत्न सुरु असून मार्मिकचे सर्व अंकही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं सांगत जो कोणी खचला असेल त्याला म्युझियम बघितल्यावर प्रेरणा मिळेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.