'यंदाही खड्ड्यांसोबत सेल्फीचा उपक्रम का राबवत नाही?', आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला सवाल

आशिष शेलारांचा राष्ट्रवादीवर निशाणा

Updated: Aug 30, 2020, 05:49 PM IST
'यंदाही खड्ड्यांसोबत सेल्फीचा उपक्रम का राबवत नाही?', आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला सवाल title=

मुंबई : यंदाही खड्ड्यांसोबत सेल्फीचा उपक्रम का राबवत नाही? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारला आहे. 'गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा "स्तुत्य उपक्रम" का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?', असा सवाल आशिष शेलार यांनी ट्विटरवरून विचारला आहे. 

तसंच 'खड्यात हरवलेल्या मुंबई- गोवा महामार्गावरुन मुंबईत परतणाऱ्या आमच्या चाकरमान्यांच्या कंबरेवर इलाज करण्यासाठी मुंबईच्या महापौरांनी आता विशेष व्यवस्था करावी! कोकणी माणसावर कुठला राग काढलाय?', अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे. 

राज्यामध्ये भाजपचं सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसने खड्ड्यांसोबत सेल्फीचे फोटो काढून सरकारवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढून ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेयर केले होते, यावरुनच आता आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.