तुकाराम मुंढेंच्या आतापर्यंतच्या धडक कारवाया

तुकाराम मुंढे आक्रमक कारवाई कऱणारे आणि हितसंबंध न जोपासणारे अधिकारी आहेत, हे २००८ साली पहिल्यांदा दिसून आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 10, 2018, 02:01 PM IST
तुकाराम मुंढेंच्या आतापर्यंतच्या धडक कारवाया title=

मुंबई : तुकाराम मुंढे यांना एक बेधडक, नीडर अधिकारी म्हणतात, हे बिरूद सर्वसामान्य लोकांनी लावलं असलं, तरी यामागे पार्श्वभूमी मोठी आहे. तुकाराम मुंढे आक्रमक कारवाई कऱणारे आणि हितसंबंध न जोपासणारे अधिकारी आहेत, हे २००८ साली पहिल्यांदा दिसून आलं.

जि.प.च्या गैरहजर शिक्षकांना घरचा रस्ता

नागपूर जिल्हा परिषदेवर २००८ साली सीईओ म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली, नियुक्ती मिळाली आणि तुकाराम मुंढे यांनी, त्याच दिवशी काही शाळांना भेट दिली. या भेटीत तुकाराम मुंढे यांना भयानक वास्तव दिसलं, जे तुकाराम मुंढेंचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं, त्या शाळांची अशी स्थिती पाहून, तुकाराम मुंढे अधिक आक्रमक झाले.

ग्रामीण शिक्षण व्यवस्था वाचवण्याचं काम

ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा या ग्रामीण शिक्षणाचा कणा आहेत, गरीब शेतकरी, मजूर, दलितांची मुलं आजही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात, तेव्हा तिथली व्यवस्था सुधारणं गरजेचं होतं.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांवर नजर

तुकाराम मुंढे यांनी आपली पहिली भेट, जिल्हा परिषदेचे सीईओ झाल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांना दिली. तो त्यांचा नागपूर जिल्हा परिषदेचा सीईओपदाचा पहिलाच दिवस होता. 

सर्व गैरहजर शिक्षकांचे निलंबन

शाळांमध्ये पोहोचल्यानंतर, अनेक शिक्षक तुकाराम मुंढे यांना गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व गैरहजर शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून शिक्षकांचं गैरहजेरीचं प्रमाण १० ते १२ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आलं.

डॉक्टरांनाही दाखवला मुंढेंनी घरचा रस्ता

प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच सीईओंनी डॉक्टरला निलंबित केलं, वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने, त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केलं. यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली २००९ साली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून झाली, हे पद खास त्यांच्याचसाठी तयार करण्यात आले होते.

जालन्याची तहान भागवण्यात मोलाचा वाटा

यानंतर मुंबईला KVIC मध्ये 2010 ला CEO म्हणून त्यांची बदली झाली. नंतर तुकाराम मुंढे हे जालन्याला जिल्हाधिकारी म्हणून आले. या ठिकाणी त्यांनी जालन्याच्या लोकांची तहान भागवली, कारण सहा वर्षापासून जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचं काम रखडलं होतं, ते काम त्यांनी ३ महिन्यात पूर्ण करून दाखवलं.

सोलापुरात वाळू माफियांना पुरूनउरले 

यानंतर २०११-१२ सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारीपदी आले. सोलापूर जिल्ह्यातही तुकाराम मुंढे राजकारण्यांना पुरूनउरले . त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. असं म्हणतात की त्यावेळीही पुढाऱ्यांनी मोठी लॉबिंग करून तुकाराम मुंढे यांची बदली केली.

१४३ कोटी रूपयांचा महसूल ५०० कोटी

यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली सप्टेंबर २०१२ साली साली, मुंबईत विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात १४३ कोटी रूपयांचा महसूल ५०० कोटीवर गेला.

कमी पैशात जलयुक्त राबवले

तुकाराम मुंढे यांनी जलयुक्त शिवार सोलापूरातील २८२ गावं घेतली. या गावातील कामे त्यांनी फक्त १५० कोटी रूपयांमध्ये केले. यात लोकांचे योगदान ५० ते ६० कोटींचे होते. वर्षाला ४०० टँकर लागणार्‍या सोलापूरात टँकरची संख्या त्यांनी ४० वर आणून ठेवली.

इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद

पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी तुकाराम मुंढे, असताना अवघ्या २१ दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी ३ हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्याचवेळी मुख्यमंत्रीसोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन त्यांनी बंद केले.

नवी मुंबईत मुंढेंसाठी जनता रस्त्यावर

नवी मुंबईत तुकाराम मुंढे यांना सर्वाधिक संघर्ष करावा लागला, कारण सर्वपक्षीय मनपा आयुक्तपदी असताना 'आयुक्तासोबत चाला' हा Walk With Commissioner चा कार्यक्रम जनतेत डोक्यावर उचलून धरला. तुकाराम मुंढे यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली.

पुण्यात आता तुकाराम मुंढे उणे

यानंतर तुकाराम मुंढे यांच्याकडे पुणे महानगरपालिकेच्या PMPML अध्यक्षपदाची धुरा आली .महिन्याला PMPML ची ६ लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या ९ लाखांवर गेली. त्यांनी मोठ्या प्रमाणात तोटा कमी केला. मात्र तेथेही राजकारणी आणि तुकाराम मुंढे यांच्यात खटके उडायला लागले आणि अखेर त्य़ांची बदली नाशिक महापालिका आयुक्तपदी झाली.